नांदुरा तालुका प्रतिनिधी )
बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला एका विद्यार्थ्याने घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आपले जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना शहरातील दुर्गा नगर या भागात १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. कल्पेश हरीष भुतडा (वय १८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
शहरातील दुर्गा नगर येथे राहणारे हरीष भुतडा यांना दोन मुले असून, लहान दहावीला तर मोठा कल्पेश हा बारावीला होता. बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे .परीक्षा असल्याने कल्पेश हा सोमवार, १० फेब्रुवारी रोजी त्याच्या खोलीत अभ्यास करत होता. वडील सायंकाळी दुकानातून घरी आले असता त्यांनी लहान मुलाला कल्पेश कुठे आहे, असे विचारले असता तो त्याच्या खोलीत अभ्यास करत असल्याचे त्याने सांगितले. जेवणाची वेळ झाल्याने वडील त्याला बोलावण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा आतून बंद केल्याचे त्यांना दिसले. वडिलांनी त्याला आवाज दिला. मात्र आतुन कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी खोलीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून डोकावून पाहिले असता आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. कल्पेश याने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
कल्पेश हा अभ्यासात खूप हुशार होता. तो शांत होता त्यामुळे फारसा कोणाशी बोलतही नव्हता. असे असतानाही त्याने परीक्षेच्या एक दिवस आधीच असे टोकाचे पाऊल उचलले. कल्पेश याची आई आणि आजी प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शोकाकुल वातावरणात कल्पेश याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्पेश याचे चुलत काका राजेश नंदकिशोर भुतडा यांनी या घटनेची नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वानखेडे हे करत आहेत .