बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी )
बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आज, १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.ओजस (ओम) रमेश बाहेकर असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. येथील वृंदावन नगरातील आपल्या घरी ओजस बाहेकर याने आज आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याने छताला कपड्याने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक रमेश बाहेकर यांचा पुत्र असलेल्या ओजस याने आत्महत्या केल्याने वृंदावन नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी त्याचे वडील रमेश बाहेकर आणि त्यांच्या पत्नी बाहेकर काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कुणी नसताना त्याने हे टोकाचे दुर्दैवी पाऊल उचलले. यावर्षी त्याने जेईईची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला कमी मार्क मिळाल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. ओम नुकताच पुण्यावरून बुलडाण्यात परतला होता.