मेहकर:-तालुका प्रतिनिधी
दुचाकी गहाण ठेवल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मुलाची हत्या करणाऱ्या पार्डी येथील माणिक राठोड या आरोपी बापास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सागर मुंगीलवार यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. साडेचार वर्षांनंतर या खूनखटल्याचा निकाल लागला.तालुक्यातील पार्डी येथील रहिवासी आरोपी माणिक केशव राठोड हा पत्नी व मुलांपासून विभक्त राहात होता. पत्नी, मुले व त्याच्यात नेहमीच खटके उडायचे. वडील माणिक याची दुचाकी मुलगा रवीकडे होती. रवीने दुचाकी परस्पर दुसऱ्याकडे गहाण ठेवली होती. या कारणावरून २० ऑक्टोबर २०२० रोजी वडील माणिक व मुलगा रवी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. माणिक राठोडने रवीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना सूनने पाहिली. या प्रकरणी आरोपीचा मुलगा मंगेश राठोड याने जानेफळ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार माणिक राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप मसराम यांनी केला. चौकशीअंती मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश २ सागर मुंगीलवार यांच्या न्यायालयात
हा खटला सुरू झाला. सरकार पक्षाचे वकील गजानन पोकळे यांनी सात साक्षीदार तपासले. तसेच विशेष सरकारी वकील संतोष एम. खत्री यांनी प्रखर युक्तीवाद केला. पुरावे आणि युक्तिवादादरम्यान गुन्हा सिद्ध झाला. त्यानंतर न्यायाधीश सागर मुंगीलवार यांनी माणिक राठोड यास आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दहा हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने कैदेची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे निकालात नमूद केले. कोर्ट पैरवी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक छाया हिवाळे यांनी काम केले.
Users Today : 20