शेगाव:-तालुका प्रतिनिधी
केसगळतीनंतरच्या नखगळतीच्या समस्येला वैतागलेल्या रुग्णांना धीर देण्यासाठी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या विविध नऊ विभागांचे पथक २२ एप्रिल रोजी शेगाव तालुक्यातील बोंडगावात पोहोचले. पथकाने रुग्णांसह गावकऱ्यांशी चर्चा केली. आजाराबद्दल माहिती घेतली. यावेळी रुग्णांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवस हे पथक बाधित गावांना भेटी देऊन केसगळती व नखगळती का होतेय, याचे कारण शोधणार आहे. पुन्हा विविध तपासण्या सुरू झाल्याने ग्रामस्थ मात्र पुरते हैराण झाले आहेत. एकदाचे निदान करा आणि या भीतीदायक आजारापासून सुटका करा, अशी मागणी रुग्ण व त्यांचे नातेवाइक करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या नऊ विभागांचे तज्ज्ञ शेगाव तालुक्यात पोहोचले.दिल्लीच्या एनसीडीसी विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. तन्झिन डिकिड यांच्या नेतृत्वात हे पथक मंगळवारी सायंकाळी पोहोचले. डॉ. प्रणिल कांबळे (सीनिअर आरडी, आरओएचएफडब्ल्यू पुणे (सदस्य सचिव), गिरीश कुमार (जीएम एफसीआय महाराष्ट्र), सुमित प्रियदर्शी (डीडी, डब्ल्यूक्यूएमएस, जेजेएम), डॉ. सुमित अग्रवाल (आयसीएमआर मुख्यालय शास्त्रज्ञ, दिल्ली), डॉ. गीती खुल्लर, सहाय्यक प्राध्यापक (त्वचाविज्ञान) एलएचएमसी, दिल्ली, डॉ. रविंदर सिंग (संचालक एफएसएसएआय), डॉ. रतन तिवारी (संचालक आयसीएआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अॅण्ड बार्ली रिसर्च, करनाल, हरियाणा) व ब्रजेश मिश्रा (सहसंचालक, प्लांट क्वारंटाइन, मुंबई, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग) यांचा या पथकामध्ये समावेश आहे. या पथकासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली भायेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बनकर तसेच अमरावतीचे विभागीय कृशी सहसंचालक पी. के. लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, मंडळ कृषी अधिकारी एम.ए. गायकवाड, बी.एम. खेडकर, डी.एन. राठोड, सुजित गावित, धनंजय कोकाटे उपस्थित होते.डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत १८ गावांमध्ये नागरिकांचे अचानक केस गळणे किंवा ‘अॅक्युट ऑनसेट अलोपेशिया टोटालिस’ची प्रकरणे नोंदविली गेली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. आता याच गावांमधील काही रुग्णांच्या हातापायावरील नख गळू लागली आहेत. हा आकडा आता ५२ पर्यंत पोहोचला आहे. आज सकाळपासून दिल्ली व मुंबई येथील आरोग्य पथक बाधित गावांमध्ये पोहोचले आहे. एका पथकाने रेशनच्या गव्हाचे वितरण होणाऱ्या गोडाऊनमध्ये भेट देऊन तेथील नमुने ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली.
Users Today : 222