चिखली:- तालुका प्रतिनिधी
एका फर्नीचर व्यावसायिकाला चाकुचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात बेड्या ठोकल्या. विवेक ऊर्फ मुठल्या ब्राम्हणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले ८ हजार ५६० रुपये हस्तगत केले आहेत. वरखेड (ता. शेगाव) हल्ली मु. खामगाव चौफुली, चिखली येथील शेख सलिम शेख हनिफ (वय २७ वर्षे) हे खामगाव चौफुलीतून बुलडाणा जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मागील तीन वर्षांपासून जुन्या फर्निचर विक्रीचे दुकान लावतात आणि रात्री तेथेच झोपतात. २४ एप्रिल २५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शेख सलिम आणि त्यांचे शेजारी पंडित गोलांडे हे दुकानात झोपलेले असताना, त्यांच्या पॅन्टच्या खिशात ११ हजार रुपये ठेवलेले होते. २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२. ३० वाजेच्या सुमारास शेख सलिम झोपलेले असताना त्यांना कोणीतरी खिशात हात घातल्याचे जाणवले. त्यांनी जागे होऊन पाहिले असता, काळ्या रंगाची टी-शर्ट घातलेला एक अज्ञात इसम त्यांच्या पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने ११ हजार रुपये काढत होता. शेख सलिम यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्या इसमाने त्यांच्या हाताला झटका मारला आणि खिशातून चाकू काढून त्यांच्या पोटाजवळ धरला. तसेच ‘जर आवाज केला तर याच ठिकाणी भोसकून टाकेल’, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातील पैसे हिसकावून रोडवर लावलेल्य काळ्या रंगाची मोटारसायकल घेऊन पळून गेला. या प्रकरणी शेख सलिम यांच्या फिर्यादीवरुन चिखली पोलिसांनी २७ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीविरुध्द भारतीय दंड संहिताचे कलम ३९४ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने माहिती मिळवली असता, उपरोक्त गुन्ह्यातील आरोपी विवेक ऊर्फ मुठल्या ब्राम्हणे असून तो सद्या रोहीदास नगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डी. बी. पथकाने तात्काळ रोहीदास नगर येथील आदर्श कॉन्व्हेंटजवळ सापळा रचून विवेक ब्राम्हणे याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात हिसकावलेल्या ११ हजार रुपयांपैकी ८ हजार ५६० रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे अवघ्या दोन तासांत सदर गुन्हा उघडकीस आला. यांनी बजावली कामगिरी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान वडणे, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, पंढरीनाथ मिसाळ, राजेश मापारी, सागर कोल्हे, निलेश सावळे, राहुल पायघन, महिला पोलीस अंमलदार माया सोनोने, रुपाली उगले यांच्या पथकाने सदर कामगिरी बजावली.
Users Today : 1