देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी
देऊळगावराजा तहसीलदारांच्या हद्दीतील खडकपूर्णा नदीपात्र व धरणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून इसरूळमार्गे रेती वाहतूक करणाऱ्या वाळूतस्करांची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अखेर चांगलीच नाकेबंदी केली आहे. इसरूळ-देऊळगावमही रोडवरील हॉटेल गारवा, चिंचखेड (ता. देऊळगाव राजा) येथे कायमस्वरुपी बैठे पथक तैनात करण्याचे आदेश काढण्यात आले असून, त्यादृष्टीने सोमवार ते रविवार अशा आठवडाभर १४ पथकांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. दोन पथके एका दिवशी नियुक्त करण्यात आले असून, चोवीस तास ही पथके तैनात राहणार आहेत. त्यामुळे लोकेशनच्या गाड्यांच्या कॅनव्हामध्ये तब्बल ७० ते ८० डंपरद्वारे वाळूचोरी करणाऱ्या वाळूतस्करांचे आता चांगलेच कंबरडे मोडणार आहे.नियुक्त करण्यात आलेल्या महसूल पथकांना दैनंदिन कामकाज सांभाळून इसरूळ-देऊळगावमही रोडवरील हॉटेल गारवा, चिंचखेड, (ता. देऊळगावराजा) येथे हजर राहून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करायची असून, या वाहनांसोबत पासेस नसतील तर त्यांची पडताळणी करून संबंधित वाहन नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करायचे आहे. तसेच सदर वाहन जप्त करून त्याचा रितसर पंचनामा करायचा आहे. दररोज दोन पथके चोवीस तास तैनात राहणार असल्याने इसरूळमार्गे होणाऱ्या वाळू वाहतुकीला आता लगाम बसणार आहे.वाळूतस्करांचे तब्बल ७० ते ८० डंपर हे लोकेशनच्या गाड्यांच्या कॅनव्हामध्ये खुलेआम वाळूतस्करी करत असल्याचा एक व्हिडिओ इसरूळचे सरपंच सतिश भुतेकर यांनी व्हायरल केला होता. या वाळूतस्करांच्या मुजोरी व वाळूचोरीची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसीलदार संतोष काकडे यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्याच दिवसी एक पथक तातडीने तैनात केले होते. त्यामुळे २८ एप्रिल पासून टिप्पर बंद आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आदेश काढत चोवीस तास १४ पथकांची तैनाती केली आहे. खडकपूर्णा नदी व धरणातून वाळूचोरी करून चोरीच्या वाळू वाहतुकीसाठी देऊळगावमही-इसरूळ मार्गाशिवाय अन्य रस्ता वाळूतस्करांना उपलब्ध नाही.त्यामुळे चिंचखेड येथील हॉटेल गारवा येथे कायमस्वरूपी बैठे पथक तैनात करण्यात आल्याने वाळूतस्करांची चांगलीच नाकाबंदी झाली आहे. ही वाळूतस्करी रोखल्याने शासनाचा कोट्यवधी रूपयांचा बुडणारा महसूल वाचणार असून, नव्याने निर्माण झालेला मलगी ते इसरूळ हा रस्तादेखील वाचणार आहे. तसेच या भागात निर्माण झालेल्या गुन्हेगारीलादेखील आळा बसणार आहे. या बैठे पथकांच्या नियुक्तीनंतर इसरूळचे सरपंच सतिश भुतेकर यांच्यासह परिसरातील सर्व सरपंचांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच या नियुक्त पथकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून वाळूतस्करी रोखावी, अशी मागणी केली आहे
Users Today : 1