एसटी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार : प्रदीप गायकी

KHOZ MASTER
2 Min Read

संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी 

एसटी व एसटी कामगारांची अवस्था कठीण झाली असून कामगारांना दडपणाखाली काम करावे लागते. परंतु त्यांचे प्रश्न व समस्या शासनाकडून सोडविल्या जात नाहीत. त्याकरीता एसटी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहे. शासनाने समस्या सोडविल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रभर लढा उभारल्या जाईल, असा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेना राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदिप गायकी यांनी दिला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशानुसार व म.न. नि. सेनेच्या सरचिटणिस रिटा गुप्ता यांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. पदाधिकारी व कामगारांना संबोधीत करतांना गायकी पुढे म्हणाले की, शासनाने जाहीर केलेल्या विविध सवलतीमुळे प्रवाशी संख्या वाढली असुन बसेसची संख्या मात्र त्या तुलनेत फारच कमी आहे. वाढत्या गर्दीमुळे व चिल्लर पैशांमुळे वाहक व प्रवाशी यांच्यात नेहमी वाद होतात. भाडेवाढ करतांना या बाबींचा विचार केला गेला नाही. कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही. कामाचा व्याप मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रशासनाने कामगारांच्या थकबाकीची रक्कमही अदा केली नाही. कर्जाचा प्रचंड बोझा कामगारांवर वाढत आहे. तसेच कामगार कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या सोई सवलती अगदी तोकड्या असून सदर समस्या शासन दरबारी मांडणार असुन सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करु. शासनाने समस्या सोडवल्या नाहीत तर संपुर्ण महाराष्ट्रभर लढा उभारु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कामगार सेना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश इंगळे, विभागिय सचिव संजय टिकार यांनीही बैठकीला संबोधीत केले. यावेळी विभागीय उपाध्यक्ष अमोल बाणाईत, आगार सचिव गणेश गव्हाळे, आगार अध्यक्ष दत्तात्रय बुरंगे, विभागिय पदाधिकारी गोपाल बोदडे, संजय आखरे, राजु पन्हाळकर यांच्यासह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *