सैलानी, :- (विशेष प्रतिनिधी):
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला खुडे उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या अमरावती शहर पोलीस इन्स्पेक्टर असलेले श्री. चरणसिंग अवघडे राजपूत यांची उपस्थिती लाभली. ध्वजारोहण प्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रास्ताविक गजानन पाटोळे यांनी केले. कार्यक्रमात पोलिस निरीक्षक श्री. राजपूत यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक भगवानराव आरसोडे यांना आदर्श विद्यालय येथे उपप्राचार्य पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतात श्री. राजपूत यांनी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणासोबत सुसंस्कार मिळाल्यास ते कधीही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत, असे प्रतिपादन केले. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये सजगतेचा सुसंस्कार निर्माण झाला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. ठोंबरे यांनी महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व उलगडून दाखवले आणि राज्याच्या स्थापनेमागील संघर्ष व समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मांजाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित पर्यवेक्षक संजय पीवटे यांनी केले. या कार्यक्रमास सल्लागार समिती सदस्य भाऊसिंग सोळंके, सदाशिवराव शिंदे, विठ्ठल सोनुने व रमेश खंडारे यांचीही उपस्थिती लाभली.
Users Today : 6