डोणगाव:- तालुका प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर चोवीस तास करडी नजर ठेवता यावी, यासाठी हाय डेफिनेशन कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यादृष्टीने केबल टाकण्याचे कामही सुरू झाले आहे. प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर हे कॅमेरे लावले जाणार आहेत. लवकरच हे कॅमेरे कार्यान्वित होऊन त्यामध्ये प्रत्येक हालचाली टिपल्या जाणार आहेत. यामुळे महामार्गाची सुरक्षा राखण्यासदेखील मदत होणार आहे. चोऱ्या, दरोड्यांच्या घटनांना यामुळे आळा बसणार आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय, काय उपाय करता येतील, याचेही नियोजन करण्याकरिता हे कॅमेरे उपयुक्त ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. महामार्ग बनविताना निर्माणकर्त्यांकडून काय चुका झाल्या, हेसुद्धा कॅमेरे लागल्यावर कळणार आहे.समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईला अवघ्या सात तासांत पोहोचता येत आहे. या मार्गाने प्रगतीत समृद्धी आणली आहे. हा मार्ग सोयीचा ठरत आहे. समृद्धी महामार्गावरून वाहतुकीची सुरुवात ११ डिसेंबर २०२३ मध्ये झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले जात आहे. ७११ किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे. सद्यस्थितीत कॅमेऱ्यांकरिता रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम सुरू आहे. अपघात, दुर्घटना घडल्यानंतर तातडीने मदत पोहोचविता यावी, संवेदनशील वाहन किंवा अपघात कसा घडला, चूक कोणाची होती, धडक देऊन पळून जाणारे वाहन, चोऱ्या, दरोडे अशा घटनांवर वॉच ठेवणे या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सोपे होणार आहे. प्रति एक किलोमीटर अंतरावर एक कॅमेरा कार्यान्वित केला जाणार आहे. त्यासाठी केबल टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. कॅमेऱ्यामधून उपाययोजनांचा अभ्यास समृद्धी महामार्गावर घडणारे अपघात हा चिंतेचा विषय आहे. संपूर्ण महामार्गावर नागपूर कॉरिडोर व मुंबई कॉरिडोर अशा दोन्ही बाजूने हाय डेफिनेशन कॅमेरे बसविल्यानंतर येणाऱ्या काळात अपघाताचे अचूक कारण व अपघातात चूक कोणाची, हे कळणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचाही अभ्यास कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे
