चिखली:- तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मुंगसरी या गावी वडिलांनी सुरू केलेली देवीच्या सोंगाची पारंपरिक प्रथा ज्ञानेश्वर चिंचोले यांनी आजही जपली आहे. १ मे २०२५ रोजी, ज्ञानेश्वर चिंचोले यांनी देवीचे आकर्षक सोंग धारण करून वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी मोठ्या भक्तीभावाने देवीच्या सोंगाचे औक्षण करून पूजन केले. ‘अंबा भवानी की जय’च्या जयघोषाने मुंगसरी गाव दुमदुमून गेले होते. या धार्मिक उत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.मुंगसरीमध्ये पूर्वी रामनवमीच्या निमित्ताने रात्रभर रामायणातील विविध पात्रांची सोंगे सादर करण्याची परंपरा होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चिंतामणराव चिंचोले हे देवीचे सोंग वठवत असत. वडिलांनी सुरू केलेली ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर चिंचोले यांनी आजही मोठ्या निष्ठा आणि श्रद्धेने पुढे चालवली आहे.१ मे ला सकाळी ज्ञानेश्वर चिंचोले यांनी देवीचे सुंदर आणि प्रभावी सोंग परिधान केले. आकर्षक वेशभूषा,चेहऱ्यावरील तेजस्वी रंग आणि विविध आभुषणे यामुळे देवीचे रूप अधिकच मनमोहक दिसत होते. डोक्यावर मोरपिसांचा आणि रंगीबेरंगी फुलांचा मुकुट तसेच पारंपरिक वस्त्र परिधान करून ज्ञानेश्वर चिंचोले यांनी देवीच्या सोंगाला जिवंत केले.गावातील प्रमुख मार्गांवरून या देवीच्या सोंगाची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि देवीच्या भजनांच्या सुरावर भाविक तल्लीन झाले होते. मिरवणुकीदरम्यान महिलांनी देवीच्या सोंगाचे औक्षण केले आणि मनोभावे पूजाअर्चना केली, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या धार्मिक परंपरेत उत्साहाने भाग घेतला.या मिरवणुकीच्या आयोजनात गावातील अनेक युवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी मिरवणुकीच्या मार्गाची व्यवस्था चोख ठेवली. भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या. ज्ञानेश्वर चिचोले यांच्या कुटुंबियांसोबतच गावकऱ्यांनीही या परंपरेला जतन करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या परंपरेविषयी बोलताना ज्ञानेश्वर चिचोले म्हणाले, माझ्या वडिलांनी ही देवीच्या सोंगाची प्रथा सुरू केली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी ती आजही पुढे नेत आहे. या परंपरेत केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर गावाची एकता आणि संस्कृतीचे जतनदेखील आहे. गावकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि त्यांची श्रद्धा पाहून मला खूप आनंद होतो आणि ही परंपरा पुढेही अशीच सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळते.मिरवणूक संपल्यानंतर गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला आणि प्रसादाचा लाभघेतला. या महाप्रसादाच्या माध्यमातून गावकऱ्यांना एकत्र येण्याची आणि एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मुंगसरी गावातील ही देवीच्या सोंगाची परंपरा केवळ एक धार्मिक रीत नाही, तर ती गावाची ओळख आणि संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ज्ञानेश्वर चिंचोले यांनी आपल्या वडिलांचा वारसा जतन करून या परंपरेला पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे गावातील तरुण पिढीलाही आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांची माहिती मिळत आहे.ज्ञानेश्वर चिंचोले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ही प्रथा कायम ठेवली आहे, ज्यामुळे गावाची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख आजही टिकून आहे. ‘अंबा भवानी की जय’च्या गजराने आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने हा उत्सव अविस्मरणीय ठरला. भविष्यातदेखील ही परंपरा अशाच उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी केली जाईल, यात शंका नाही.
Users Today : 8