स्मशानभूमीतील लिंबाच्या झाडाला ठोकल्या काळ्या बाहुल्या ! अघोरी प्रकाराने इसरूळ ग्रामस्थांवर भयाचे सावट

Khozmaster
3 Min Read

चिखली:- तालुका प्रतिनिधी 

भूत भानामतीला खतपाणी घालणाऱ्या काही ढोंगींनी गावकऱ्यांच्या मनात भुताटकी जागा करण्याचा अघोरी आणि भीतीदायक प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. स्मशानभूमीतील लिंबाच्या झाडाला काळ्या बाहुल्या गोट्यांसह खिळ्यांच्या साह्याने ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.आधीच काही रहस्यमय घटना गावात घडल्या, त्यात आता अशाप्रकारे काळे बाहुले झाडाला टाचून गावातील सलोखा बिघडविण्याचे काम केले जात असल्याचे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे. इसरूळमधील एका तरुणाच्या त्रासादायक अनुभवांबद्दल त्याचे थोरलेबंधू आणि गावकऱ्यांनी तसेच काही प्रत्यक्षदर्शीनी यासंदर्भात माहिती दिली. स्मशानभूमीतील लिंबाच्या झाडावरील बाहुल्या व गोटे यामुळे गावकरी अधिकच भयभीत झाले आहेत. काही बाहुल्यांचे डोके आणि शरीरावर गोटेही ठोकण्यात आले आहेत.या रहस्यमय प्रकारांमागे काय कारण असावे, याबाबत गावात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. काहीजण याला काळी जादू किंवा वाईट शक्तींचा प्रभाव मानत आहेत, तर काहीजण याला केवळ अंधश्रद्धा आणि भीतीचे वातावरण असल्याचे सांगत आहेत. एकापाठोपाठ घडलेल्या विचित्र घटना आणि स्मशानभूमीतील धक्कादायक दृश्य यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, पूर्वी अशा प्रकारच्या गोष्टी क्वचित बघायला मिळत होत्या, पण आता हे प्रमाण वाढले आहे. यामुळे गावातील शांतता भंग झाली असून, लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः महिला आणि लहान मुले यामुळे अधिक घाबरले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.स्मशानभूमीत बाहुल्या आणि गोटे कोणी लावले, यामागे त्यांचा उद्देश काय आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच, गावात घडलेल्या गुढ घटनांमागील सत्यता तपासणेही महत्त्वाचे आहे, जेणेकरून नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होईल आणि त्यांना दिलासा मिळेल. प्रशासनाकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा करत आहेत. या रहस्यमय घटनांचा उलगडा कधी होणार आणि गावकऱ्यांच्या मनातील भीती कधी दूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेमानसिक त्रास देण्याचा प्रयत्न : संतोष भुतेकर गावातील काही रिकामटेकड्या लोकांकडून असे प्रयोग होत आहेत. या माध्यमातून गावातील लोकांना त्रास देणे, गावातील शांतता भंग करणे हाच प्रकार आहे. आज ज्यांना त्रास झाला ते मात्र समोर येणार नसल्याने हा खोडसाळपणा करणारा करत राहील आणि लोकांना भयभीत करण्याचा आसुरी आनंद उपभोगेल, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी व्यक्त केली.मनात भीती वाढविण्याचे कारस्थान : सरपंच भुतेकर स्मशानभूमीत घडत असलेला हा प्रकार म्हणजे गावातील नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एक कट कारस्थान आहे. हा प्रकार हाणून पाडण्यासाठी लवकरच याबाबत ठोस पावले उचलणार असल्याचे सरपंच सतीश भुतेकर यांनी ‘पुण्य नगरी’शी बोलताना सांगितले. न घाबरता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा : किशोर वाघ अशाप्रकारे काळी बाहुली, लिंबू आणि गोटे झाडाला ठोकून करणी, जादूटोणा, भानामती केल्याचा भास निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यातून जनसामान्यांमध्ये भीती पसरविण्याचा हा खोडसाळ प्रकार आहे. यामुळे प्रत्यक्षात कुणाचे काहीच नुकसान होत नाही. याला घाबरून जाण्याचे काहीच कारण नसून नागरिकांनी निर्भय होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी किशोर वाघ यांनी केले आहे. अशा कृत्यांमधून भीती पसरविणे हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा असून तो अजामीनपात्र आहे. अशा प्रकरणात पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करू शकतात, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

0 9 5 5 0 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *