१३४ प्रश्नांची उत्तरे सोडवून विद्यार्थिनींचे बाबासाहेबांना अभिवादन ! पाच विद्यार्थिनी ठरल्या पुरस्काराच्या मानकरी १३४ व्या जयंतीनिमित्त वरवंड जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी 

वरवंड येथील जिल्हा परिषद शाळेत कल्पना माने या उपक्रमशिल शिक्षिका विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी विविध उपक्रम राबवितात. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंतीनिमित्त व त्यांच्या विचारांना मानवंदना देण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून १३४ प्रश्नांची प्रश्नावलीचा उपक्रम शाळेत राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना ही प्रश्नावली सोडविण्याकरिता देण्यात आली. त्यातील पाच विद्यार्थिनी ज्ञानाचा खजिना असलेल्या पुस्तकांच्या पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या. या प्रश्नावलीची तयारी १ फेब्रुवारीपासूनच सुरू करण्यात आली होती. विद्यार्थी बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तके वाचून त्यांचे जीवनचरित्र व कार्य समजून घेत होते. लायब्ररीतून पुस्तके घेऊन, नेटवर सर्च करून, इतरांना विचारून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण कार्याची माहिती जमा केली. जसजसे विद्यार्थी वाचन करत होते, तशी त्यांना या विषयात आवड निर्माण झाली. अखेर बाबासाहेबांच्या १३४ व्या जयंतीच्या औचित्यावर १३४ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली.
१४ एप्रिलला पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली. विशेष म्हणजे प्रश्नांच्या उत्तरांना पर्याय नव्हते. विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे आठवून लिहावयाची होती. त्यामुळे एकाग्रतेने आणि सखोल वाचन विद्यार्थ्यांनी केले. स्पर्धेची संकल्पना आणि निर्मिती कल्पना माने यांनी केली. वरवंड येथील जिल्हा परिषद शाळा डोंगरखंडाळा केंद्रातील उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण म्हणून ओळखली जाते. शाळेतील सर्वच शिक्षक स्कॉलरशिप, नवोदय आणि एनएमएमएससाठी सतत  प्रयत्नशील असतात. बक्षीसरूपात दिली अनमोल पुस्तके स्पर्धेत भाग घेतलेल्यापैकी प्रथम पाच क्रमांकांना बक्षीसरूपाने पुस्तके देण्यात आली. त्यामध्ये जग बदलणारा बापमाणूस, आपण जिंकू शकता, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड, अंतः अस्ति प्रारंभः आणि मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी ही पुस्तके देण्यात आली.
वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रयत्न मोबाइलमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणारा ठरला आहे. वाचनसंस्कृतीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे शिक्षिका कल्पना माने यांनी सांगितले.

0 9 5 5 0 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *