किडनी देऊन मुलास मृत्यूच्या दाढेतून आणले परत

Khozmaster
4 Min Read

देऊळगाव राजा:- तालुका प्रतिनिधी 

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे स्थान मोठे असते. कितीही जन्म घेतले तरी तिचे ऋण फेडल्या जावू शकत नाहीत. जन्म देताना आईचा पुनर्जन्म होतो आणि आपल्या पोटच्या गोळ्यावर जीव ओवाळून टाकते. मुलांवर कोणतेही संकट आले तरी आईच पुढे होते. येथील रहिवासी असलेल्या लता शिंगणे यांनी स्वतःची एक किडनी देऊन एकवीसवर्षीय मुलगा ऋषी याला जीवदान दिले. पुत्रप्रेमापोटी या वात्सल्यसिंधू आईने किडनीदानाचा धाडसी निर्णय घेतला. मातेच्या या प्रेरणादायी कृतीचे कौतूक होत आहे.ऋषी देवीदास शिंगणे या तरुणाचे २१ वर्षांचे वय नव्या स्वप्नांना जिद्दीचे पंख लावून आयुष्याला आकार देण्याचे होते. नियतीला कदाचित त्याची आणखी परीक्षा पाहायची होती. ऋषीला जन्मतःच एक किडनी नव्हती. जी होती ती निकामी झाल्याने कुटुंब हादरले. कोलमडून पडण्याची वेळ आली. मात्र त्याची आई लता शिंगणे यांनी खचून न जाता मुलास वाचविण्याची धडपड सुरू केली. कठोर झालेल्या नियतीमुळे वादळात चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी या मातेने आपले काळीज मोठे केले आणि स्वतःची एक किडनी देऊन त्यास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.’आई’ या शब्दात महान विचार सामावला आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू, आईविना हे जग सुने आहे. ममतेने ओतप्रोत भरलेल्या मातेच्या मुलांच्या बाबतीत अनेक कल्पना असतात. कोणत्याही स्त्रीला आपल्या मुलांचे हित तसेच मुलांना सुखी ठेवताना जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे. कठीण प्रसंगी आईच मुलांसाठी आपला जीव धोक्यात घालते. लता देवीदास शिंगणे या मातेच्या जीवनात मोठा संघर्ष वाट्याला आला. मात्र या संकटातून त्यांनी मार्ग काढला.देऊळगाव मही येथील लता देवीदास शिंगणे यांना मंगेश आणि ऋषी अशी दोन मुले आहेत. ऋषी अवघ्या सहा वर्षांचा असतानाच पितृछत्र हरवले. तरीही लता मागे हटल्या नाहीत. धुणी भांडी, घरकाम करत आपल्या पिल्याना मायेची उब देण्याचे काम त्यांनी केले. पालनपोषण करत शिकविले. मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत असतानाच २०२२ ला ऋषीची प्रकृती बिघडू लागली. औषधोपचार केल्याच्या पुन्हा १५ दिवसांनी आजार वाढतच गेला. पुणे येथे तपासणी करावी लागली. नंतर छत्रपती संभाजीनगर येथे तपासण्यात करण्यात आल्या.संभाजीनगर येथे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये त्याच्या शरीराच्या संपूर्ण तपासण्या केल्या असता दोन्ही किडन्यांमध्ये असलेला दोष दिसून आला. त्याच्या शरीरात आधीच एक किडनी नव्हती, दुसरी २० टक्के काम करत होती. त्याच्या यातना तसेच शरीरात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे सर्वांचीच मानसिकता खचत चालली होती. किडनीची आवश्यकता लक्षात आली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता खर्चाचा आकडा पाहून निश्चितच सर्वांना धक्का बसणे साहजिकच होते. मुलाच्या जन्मानंतरही जे समाधान मिळाले नाही. किडनी दान केल्यानंतर मिळाले. ऋषीच्या यातना मी जवळून पाहिल्या आहेत. त्याच्या सुखासाठी मी जे काही केले ते कमीच आहे. शस्त्रक्रिया पार पडण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केले. जीवाचा धोका पत्करला डॉ. मिलिंद वैष्णव, डॉ. अजय ओसवाल, डॉ. समीर महाजन यांनी किडनी देण्याची इच्छा असेल तर किडनी ट्रान्सफर करताना संभाव्य धोकेदेखील सांगितले. लता शिंगणे यांनी किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. धोके लक्षात घेतल्यानंतरही आपल्या मुलाला किडनी देण्यावर त्या ठाम होत्या. अखेर किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले आणि मुलास जीवन जगण्याचे बळ मातेने दिले. २६ मार्च रोजी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आज मुलगा व आई दोघांची प्रकृती चांगली आहे.डॉक्टरांच्या टीमला यश लता शिंगणे व ऋषी शिंगणे यांच्या किडनी प्रत्यारोपणाप्रसंगी कमल नयन बजाज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉर्ज फर्नांडिस, वैद्यकीय संचालक डॉ. अजय शेटे, अवयव प्रत्यारोपण प्रमुख डॉ. मिलिंद वैष्णव, डॉ. अजय ओसवाल, डॉ. राजेश सावजी, डॉ. समीर महाजन, डॉ. निखिल इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. डॉ.गोडे दाम्पत्य देवदुतासारखे धावले लता शिंगणे यांच्याकडे अवघी १७ गुंठे शेतजमीन. अशा परिस्थितीत त्या देऊळगाव मही येथील डॉ. अलका गोडे व डॉ. ज्ञानेश्वर गोडे यांच्याकडे मागील बारा वर्षांपासून घरकाम करत होत्या. अगोदर लता शिंगणे यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यात आता मोठे संकट उभे ठाकले होते. या संकटातून मार्ग काढून देण्याचे काम डॉ. ज्ञानेश्वर गोडे व डॉ. अलका गोडे, डॉ. स्नेहल गोडे यांनी केले. शस्त्रक्रियासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. लता व त्यांचा मुलगा ऋषी यांच्यासाठी गोडे दाम्पत्य देवदूत ठरले.

0 9 5 5 0 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *