मलकापूर:- तालुका प्रतिनिधी
रेल्वे स्टेशनवर गाडी थांबताच उन्हाच्या तीव्रतेमुळे तहानेने व्याकूळ झालेली माऊली स्टेशनवरील पाणपोईकडे वळली. शीत जल व लिंबू सरबत तिने पिले. त्याचवेळी डोळ्यांदेखत गाडी वेगाने निघाली आणि त्या माऊलीने एकच टाहो फोडला. माझी चार वर्षांची चिमुकली त्या रेल्वेगाडीत राहिली, माझी मदत करा, अशी आर्त हाक मारली. तोपर्यंत रेल्वे गाडीने काही किलोमीटर अंतर पार केले होते. अशा परिस्थितीत त्या मातेची हाक अनेकांच्या हृदयाला भिडली. जनता जलसेवा मित्र मंडळ व रेल्वे स्टेशन प्रबंधक धर्मेंद्रसिंह ठाकूर यांच्या सजगता दर्शविली आणि त्या माऊलीला रेल्वे जिथे थांबली तिथपर्यंत दुचाकीने पोहोचून मायलेकीची भेट घडविली. यावेळी तिच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.१ मे रोजी रेल्वे प्रशासनाने प्रवासी जनतेला प्रचंड उष्माघातापासून बचावाकरिता शीतल जलसेवा, सरबत सेवा उपलब्ध सामाजिक सेवा संघटनेच्या सहकार्यातून उपलब्ध करून दिली आहे. मलकापूर येथील स्टेशन प्रबंधक धर्मेंद्रसिंग ठाकूर यांनी मलकापूर येथील प्रवासी जनतेला लाभ पोहचून देण्याच्या कार्याचा शुभारंभ केला. मलकापूर येथील रेल्वे स्टेशनवर अनेक वर्षांपासून प्रवासी गाड्या व प्रवासी जनतेला शीतल जलसेवा उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचे औचित्य साधून १ मे रोजी महाराष्ट्रदिन व कामगारदिन तसेच गजाननाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या मलकापूर येथे गुरुवारनिमित्त स्थानिक स्टेशन मास्तर ठाकूर यांच्या हस्ते गजाननाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गंगानगर व बडनेरा-नाशिक मेमू गाडीतील प्रवासी जनतेला जल व सरबतचे वाटप करीत त्यांची तृष्णा शांत केली. त्यानंतरही जवळपास ५ ते ६ गाड्यांमधील प्रवाशांना वाटप करण्यात आले. जनता जलसेवा रेल्वे स्टेशनवरील पाणपोईचा उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या नंदकिशोर कोठारी, राजू कोचर, जयविजय राठी, रमेश उमाळकर,स्टेशन मास्तर ठाकूर यांच्यासह मिलिंद डवले, डॉ. पटणी, अॅड. वानखेडे, अॅड. बाळासाहेब सोमण यांनी या उपक्रमाचे कौतूक करीत सहकार्य केले. दरम्यान, बडनेरा-नाशिक मेमो गाडी दुपारी १.३० वा. सुमारास मलकापूर स्थानकावर थांबली. पिण्याच्या पाण्याकरिता व्याकूळ झालेली एक महिला तृष्णा भगविण्याकरिता याच पाणपोईवर गेली. पाणी व सरबत पिल्यानंतर तिच्या लक्षात आले की, आपली मुलगी आपल्या सोबत नाही तर ती गाडीतच राहिली. तोपर्यंत गाडी निघाली होती. ही बाब लक्षात येताच ती महिला आक्रोश करू लागली.तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या स्टेशन प्रबंधक ठाकूर यांनी त्वरित हालचाली केल्या. त्यावेळी गाडीने मलकापूर स्टेशन सोडून बरेच किलोमीटर गाडी पुढे निघून गेली होती. तरीही ठाकूर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पुढाकार घेत गाडी पुढे थांबविली. तर जनता जलसेवा मंडळाचे जयविजय राठी यांनी त्वरित मोटारसायकलने त्या महिलेला रेल्वे थांबलेल्या ठिकाणापर्यंत घेऊन जात त्या महिलेची व तिच्या मुलीची भेट घडवून आणली.त्यावेळी महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तर स्टेशन प्रबंधक ठाकूर यांची सजगता जयविजय राठी व जनता जलसेवा मंडळाची धावपळ प्रकर्षाणे दिसून आली.
Users Today : 10