जलसंधारण अभियंत्याची ड्युटीला दांडी; रिकाम्या खुर्चीला घातला हार उद्धवसेनेचे गांधीगिरी आंदोलन

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी 

जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे नेहमीच कर्तव्याला दांड्या मारत असल्याने शासकीय कामकाजासोबतच प्रकल्पांची अनेक कामे रखडली आहेत. दरम्यान, अधिकाऱ्याचा बेफिकीर कारभार पाहता शिवसेना (उबाठा) चे मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे यांच्यासह शिवसैनिकांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करत निषेध केला.मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील गट नंबर ४९ जवळ मोहगंगा नदी पात्रामध्ये २०१९ मध्ये सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याचे पाणी नदीपात्रात तुंबल्यामुळे रस्ता बंद झाला होता, हा रस्ता सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर मे २०२३ मध्ये नदीपात्रामध्ये हयूम पाइप बॉक्स कल्व्हर्टचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले. बांधलेल्या पुलाचे काम कमी उंचीचे असून, त्यामध्ये टाकलेले सिमेंट पाइप हे लहान आकाराचे दोनच पाइप टाकले आहेत. बॉक्स कल्व्हर्टची रुंदी ही नदी पात्रापेक्षा कमी असल्याने १९ जुलै २०२३ रोजी मोहगंगा नदीला आलेल्या पहिल्याच पुरामुळे बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंचा अॅप्रोच खरडून रहदारीचा रस्ता बंद पडला. याबाबत २४ जुलै २०२३ रोजी निकृष्ट कामाबाबत तक्रार करण्यात आली होती. अखेर तेथीलच बाजूची माती खोदून रस्त्यामध्ये भराव टाकू रस्ता तात्पुरता रहदारीस सुरू करण्यात आला.२०२३ मध्ये टाकलेल्या मातीचा भराव २०२४ च्या पहिल्या पावसात वाहून गेल्याने रस्ता बंद पडला. याबाबत स्मरणपत्र देण्यात आले. योग्य त्या पक्क्या रस्त्याबद्दल कारवाई झाली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेती अवजारे शेतात नेता येत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. काढणीस आलेला शेतमाल अतिवृष्टीत खराब झाला, तर काही शेतकऱ्यांचे सोयाबिन व मका पीक वाहून गेले. अशा विविध समस्या उद्भवल्या असतानाही मृद व जलसंधारण विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. त्यातच अधिकारी अमोल मुंडे हजर राहात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्याकरिता बंद असलेला रस्ता चांगल्या दर्जाचा तत्काळ सुरू करून द्यावा तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी तथा संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे,अमोल मुंडे हजर नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सुरेश बऱ्हाटे, राजेंद्र काजळे, पांडुरंग बहऱ्हाटे, परशुराम बहऱ्हाटे, ओंकार बऱ्हाटे, गोपाळ पाटील, सुनील विखारे, अजय विखारे, गणेश सुशीर, सतीश शेळके, प्रफुल वराडे यांनी सहभाग घेतला.

0 9 5 5 0 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *