श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचा संगम – भव्य वाहन रॅलीद्वारे भगवान परशुरामांना अभिवादन
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
नागपूर, दि. ४ (प्रतिनिधी)
परशुराम जयंतीच्या पावन निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (ABBM) तर्फे भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाने भारलेली ही रॅली भगवान विष्णूंच्या सहाव्या अवतार भगवान परशुरामांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात गोरक्षण मंदिरात पारंपरिक पूजा आणि आरतीने झाली. यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी उपस्थित राहून, “लवकरच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे दुसरे कार्यालय सुरु करण्यात येईल,” अशी घोषणा केली. त्यांच्या सोबत ABBM महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री निखिल लातूरकर देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात गोरक्षण सभामंदिर येथून झाली. रॅली लोकमत चौक, काचेपूरा चौक, बजाज नगर चौक, लक्ष्मी नगर चौक, आठ रस्ता चौक, तात्या टोपे नगर, खामला चौक, प्रताप नगर चौक, बँकर नगर चौक, शंकर नगर चौक मार्गे रामनगर चौक येथे संपन्न झाली. रस्त्यावर गुलालाच्या तोफांनी आकाश रंगवले गेले, फुलांच्या सुगंधाने वातावरण भारावून गेले. रामदास पेठ येथे शिख बांधवांनी रॅलीचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
स्थानिक नागरिकांनी रॅलीचे थंड पाणी, पेय व फुलांच्या वर्षावाने जल्लोषात स्वागत केले. २००० हून अधिक पारंपरिक वेशातील भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीतील मुख्य आकर्षण ठरली अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती व भगवान परशुरामांची भव्य रथयात्रा. तसेच शिवशक्ती आखाडा नागपूर शंखनाद संघटनेच्या लहान बालकांनी सादर केलेले शास्त्रीय सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून गेले.
या यशस्वी आयोजनामागे पराग जोशी यांच्या नेतृत्वाचे व नितीन पतवर्धन (अध्यक्ष, ABBM) यांचे सहकार्य लाभले. तसेच श्री हेमंत दस्तुरे, श्री पंकज खिरवडकर, श्री जय पाठक, अश्विनी सोहोनी, अंकुश हर्करे, ध्येय चासकर, डॉ. अक्षय ढोबळे आणि श्री तुषार पिदाडी यांनी मोलाचे योगदान दिले.
भगवान परशुरामांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करत, श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा संदेश देणारी ही रॅली नागपूर नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण करत यशस्वीरित्या पार पडली.
Users Today : 9