नागपूर ग्रामीणमध्ये जबरी चोरी प्रकरणात पोलिसांची यशस्वी कामगिरी – २४ तासांत चार आरोपींना अटक

Khozmaster
2 Min Read

नागपूर ग्रामीणमध्ये जबरी चोरी प्रकरणात पोलिसांची यशस्वी कामगिरी – २४ तासांत चार आरोपींना अटक

कळमेश्वर – कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणात कळमेश्वर व काटोल पोलीसांची संयुक्त कारवाई करत अवघ्या २४ तासांत चार आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तात्काळ कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२ मे २०२५ रोजी फिर्यादी आस्तिक देवनाथ कुमेरिया (वय २४, रा. कबरपिपला, सौसर, म.प्र.) हे दुपारी १.१५ वाजता चिचभवन येथून कळमेश्वरकडे मोटारसायकलवर जात असताना मेटलॉक कंपनीजवळील उड्डाणपुलावर दोन मोटारसायकलवर डबलसीट आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी पिस्तुलचा धाक दाखवून फिर्यादीकडील बॅग हिसकावली व पसार झाले. बॅगेत ७,२२० रुपये रोख, ३३५ रुपये सीडीटी अमाउंट, लिनोवो कंपनीचा टॅब, बायोमेट्रिक मशीन व महत्त्वाची कागदपत्रे होती.

या प्रकरणी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०९(४), ३(५) बीएनएस तसेच कलम ३+२५ आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, प्रभारी पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि मनोज काळबांडे (कळमेश्वर) व पोनि निशांत मेश्राम (काटोल) यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथक तयार करण्यात आली.

तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत आरोपींचा शोध घेऊन ३ मे रोजी पहाटे १२.५४ वाजता काटोल व डोंगरगाव जंगल परिसरातून चारही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – दिनेश मधुकर पवार (वय २४), दिनेश तेजराम मारवाडी (वय २०), सुर्यवंशी राजा राजपूत (वय २२), नागेश ज्ञानेश्वर पवार (वय २६) अशी आहेत.

ही कामगिरी पोनि मनोज काळबांडे, पोनि निशांत मेश्राम, सपोनि सविता वड्डे तसेच पोलीस कर्मचारी सुनील मिश्रा, प्रजोक तायडे, अनिस शेख, निखील मिश्रा, विवेक गाडगे, अभयसिंग ठाकुर यांच्या संयुक्त प्रयत्नातून साधली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि सविता वड्डे करत आहेत.

या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे कळमेश्वर व काटोल परिसरात पोलिसांप्रती विश्वास दुणावला असून आरोपींना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

0 8 9 4 7 1
Users Today : 1
TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *