धोत्राभणगोजीः-विशेष प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील धोत्राभणगोजी येथे शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. आगीत २ शेतकऱ्यांचे टिनशेडसह, सोयाबीन, तूर व शेती साहित्य जळून खाक झाल्याने यामध्ये ९ लाख ४६ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. चिखली अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी ४ जनावरांना बचाविण्यात यश आले. सदर घटना २ मे रोजी घडली.धोत्राभणगोजी भाग-१ मध्ये गट क्र.७६ मध्ये वाल्मीक रामकृष्ण कोईगडे तसेच विठोबा रामकृष्ण कोईगडे या दोघा भावांची शेती आहे. शेतमाल व शेती साहित्य ठेवण्यासाठी दोघांनी शेतामध्ये टिनशेड बांधले असून ते शेतमाल ठेवतात. शुक्रवार २ मे रोजी अचानक शॉट सर्किट झाल्याने या आगीमध्ये विठोबा कोईगडे यांच्या शेतातील टिनशेडचा गोठ्याला आग लागली. आगीने पाहता-पाहता मोठे रौद्ररुप धारण केल्याने या आगीत त्यांचे जनावरांचे खाद्य कुटार, भुसा, चारा, स्पीकलर सेट, ८ नोझल, ३० पाईप, ५५ टिनपत्रे, ५ क्विंटल लोखंड, १ पेट्रोल पंप, शेती अवजारे, वखर, तिफन, डवरे टोकणयंत्र आदी शेती साहित्य १०० टक्के जळून खाक झाल्याने त्यांचे २ लाख २७हजाराचे नुकसान झाले.
आग वाल्मिक रामकृष्ण कोईगडे यांच्या टिनशेडपर्यंत गेली होती. मात्र अग्निशमन दल वेळीच पोहचून आग विझविण्यात यश मिळविले. मात्र, तोपर्यंत त्यांचे तिफन, वखर, डवरे, ३ पेट्रोल पंप, स्पींकलर पाईप ३ सेट, सोयाबीन व तुरीचे बियाणे ११ पोते, सोयाबीन ५ पोते, तूर ६ बॅग, रासायनिक खत, ७ताडपत्री, टिनपत्रे १२५ नग, अँगल वीस क्विंटल, जनावरांचे कुटार, भुसा ५ ट्रॉली, शेणखत २० ट्रॉली, शाळूचारा २ ट्रॉली अशाप्रकारे ७ लाख १९ हजार ९०० रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा पंचनामा पंचासमक्ष करण्यात आला. यावेळी शेतकरी विठोबा कोईगडे, उपसरपंच अशोक शिंदे, सदस्य विश्वंभर हळदे, प्रविण इंगळे, विवेक पवळ, गणेशअकर, संकेत पवळ, अनिल कोल्हे, वाल्मिक कोईगडे, मंगलाबाई कोल्हे, रंगनाथ हळदे, श्रीधर पोफळे आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.
Users Today : 11