जळगाव जा:-विशेष प्रतिनिधी
भाजपाचे कार्यकर्ते तथा आ. डॉ. संजय कुटे यांचे पूर्वी असलेले वाहन चालक पंकज उत्तमराव देशमुख (वय ४५ वर्षे) हे ३ मे रोजी सायंकाळचे दरम्यान बऱ्हाणपूर मार्गावरील त्यांचे शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.सदर घटनेची माहिती मिळताच पंचनामा करून त्यांना लटकलेल्या अवस्थेतून पोलिसांनी खाली काढले. त्यांच्या शरीरावर असलेल्या रक्ताच्या निशान्या बघता त्यांची आत्महत्या की हत्या आहे अशी चर्चा लोकांमध्ये होती.परंतु शवविच्छेदन फॉरेन्सिक अहवाल यावरून शरीरावर असलेल्या त्या जखमा नसून कानातून आलेले रक्त पडले व सदर घटना ही आत्महत्याच असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांसमोर सांगितले आहे, असे जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.शनिवारी सायंकाळच्यादरम्यान बऱ्हाणपूर रोड लगत वायाळ गढीजवळील त्यांचे शेतात झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला होता. प्रत्यक्ष ठाणेदार श्रीकांत निचळ आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. आ. डॉ. संजय कुटे आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच वेळी त्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर त्यांची उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून अकोला येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले.पंकज देशमुख हे भाजपाचे कार्यकर्ते असून कंत्राटदार होते. सदा हसतमुख व सर्वांशी मनमिळाऊ म्हणून त्यांची ओळख होती. पंकज ह्याचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची फिर्याद अनंता मधुकरराव देशमुख यांनी जळगाव जा. पोस्टेला दिली. त्यावरुन पोलिसांनी २१/२०२५, कलम १९४ बीएनएसनुसार मर्ग दाखल केला. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय घट्टे हे करीत आहेत.
Users Today : 11