अतिक्रमण हटविण्यावरून पेनटाकळीत तणाव डीवायएसपींसह तीन ठाणेदार फौजफाटा घेऊन दाखल : तहसीलदारही हजर

Khozmaster
2 Min Read

डोणगाव:- तालुका प्रतिनिधी 

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पांतर्गत पेनटाकळी गावाचे पुनर्वसन मागील २७ वर्षांपासून रेंगाळले आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही ३ मेपासून सुरू झाली. हे अतिक्रमण काढण्यावरून सोमवारी सकाळी मोठा तणाव निर्माण झाला. ग्रामस्थ व पोलिसांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. प्रकरण वाढत गेल्याने साखरखेर्डा, डोणगाव, मेहकरचे ठाणेदार फौजफाटा घेऊन दाखल झाले. तर खुद्द तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारीदेखील पोहोचले. जमावाला शांत करताना पोलिसांची दमछाक झाली. अखेर बहुतांश अतिक्रमण हटविण्यात आले.पेनटाकळी गावातील जमीन धरणासाठी संपादित झाल्यानंतर गावाचे पुनर्वसन करताना विविध अडथळे निर्माण झाले होते. आपला हक्क मिळविण्याकरिता प्रकल्पग्रस्तांना आंदोलने करावी लागली. दरम्यान, तोडगा निघाल्याने शासनाने गावाच्या पुनर्वसनासाठी जमीन निश्चित केली. त्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे पुन्हा पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित झाला. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने ३ मेपासून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू झाली. ५ मे रोजी पुन्हा अतिक्रमण काढत असताना वाद झाला.वादग्रस्त परिस्थिती ओढवणार म्हणून तहसीलदार नीलेश मडके व महसूल कर्मचारी हजर होते. मात्र गावात अफवा पसरल्याने एक मोठा जमाव ग्रामपंचायतीवर चालून आला.यामुळे धास्तावलेले तहसीलदार, ग्रामसेवक, महसूल कर्मचाऱ्यांनी स्वतःला ग्रामपंचायतीमध्ये कोंडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवरही दगडफेक केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जमावाला शांत केले. प्रचंड तणाव निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने काहीच घडले नसल्याबाबत इन्कार केला. वातावरण चिघळण्याची स्थिती निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार, डोणगाव ठाणेदार अमर नागरे, साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवार यांनी शांताता समितीची बैठक घेतली. अफवेवर विश्वासन ठेवता प्रशासनावर भरवसा ठेवा, प्रशासन तुमच्या गावाच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न मिटवून घरासाठी जागा उपलब्ध करून देईल. तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

0 9 5 5 1 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *