१२ तासांत घरफोडी उघडकीस : रामटेक पोलिसांची यशस्वी कारवाई, ३ आरोपी अटकेत
रामटेक (नागपूर) – रामटेक येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत रामटेक पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. या उत्कृष्ट कारवाईमुळे नागरिकांत पोलीस दलाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.
फिर्यादी निलेश जगन मुळे (वय ३२, रा. नगरधन, ता. रामटेक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ मेच्या रात्री ८ वाजेपासून ते ३ मेच्या दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सुमारे ₹७२,७५० किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक (प्रभारी) मा. श्री रमेश धुमाळ यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री आसाराम शेटे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने काम सुरू केले. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे, खालील तिघा आरोपींना अटक करण्यात आली:
1. रामा उर्फ बांड्या मारोती दांडेकर (वय २३), रा. गिट्टीखदान, नागपूर
2. बबलु अंबादास दांडेकर (वय २७), रा. गंगानगर वाडी रोड, नागपूर
3. गोलु अंबादास दांडेकर (वय २४), रा. गंगानगर वाडी रोड, नागपूर
तपासादरम्यान आरोपींकडून ₹५१,००० किमतीचे सोन्या-पांढऱ्या धातूचे दागिने जप्त करण्यात आले. मा. न्यायालयाने आरोपींना ८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या जलद आणि परिणामकारक तपासामुळे रामटेक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 1