चिखली:- तालुका प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील जनतेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे वारे जोर धरू लागले आहेत. काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याच्या वाढदिवशीच पक्षासाठी धक्कादायक घडामोड घडली. काँग्रेसमध्ये निष्ठावान समजले जाणारे चिखली पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि अल्पसंख्याक समाजातील काही प्रमुख चेहरे बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाले.चिखली नगरपालिकेत सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि दोन टर्म उपनगराध्यक्ष पद भूषवलेले अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर यांनी आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अब्दुल रफिक यांनी नगरपालिकेत शिक्षण सभापती व विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले असून, काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सोबत मोहम्मद रशीद मोहम्मद हशम, शेख सलीम शेख अहमद आणि अन्य व्यक्तींचा यात समावेश आहे. काँग्रेसच्या मतपेढीला धक्का ? शहरात अल्पसंख्याक समुदायाची मोठी मतबँक असून, या मतपेढीने काँग्रेसला सातत्याने पाठबळ दिले आहे. मात्र, गेल्या पाच – दहा वर्षापासून प्रमुख चेहऱ्यांनी काँग्रेसपासून दुरावा घेतला आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केलेले अब्दुल रफिक आणि इतर प्रमुख कार्यकर्ते हे काँग्रेसचे ज्येष्ठ समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या मतपेढीला धक्का बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
Users Today : 15