पोलीस आयुक्तांची रहाटेनगर टोळी झोपडपट्टीला धडक – गुन्हेगारांना थेट इशारा!

Khozmaster
2 Min Read

पोलीस आयुक्तांची रहाटेनगर टोळी झोपडपट्टीला धडक – गुन्हेगारांना थेट इशारा!

 

नागपूर, ७ मे २०२५:

शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी धडक पाऊल उचलले. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट रहाटेनगर टोली झोपडपट्टीत पोलीस फौजफाट्यासह प्रवेश केला. गुन्हेगारांना इशारा देणारी ही कारवाई संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

रहाटेनगर टोळी ही झोपडपट्टी गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील मानली जाते. पोलीस आयुक्तांनी स्वतः गल्लीबोळांत फिरून घरफोडी, खून, गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांच्या घरी थेट झडती घेतली. महेंद्र मानकर, करण आणि संदीप नाडे, जय शिववंशी, अमन रंगारी आदींच्या घरांमध्ये पोलीस आयुक्तांनी तपास केला. यावेळी काही गुन्हेगार तुरुंगात असल्याची माहितीही समोर आली.

झोपडपट्टीतील काही नागरिक पोलीस आयुक्तांची उपस्थिती पाहून थक्क झाले. “आमच्या वस्तीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या दर्जाचे अधिकारी आले,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पोलिस आयुक्तांनी दारू विक्री करणाऱ्या महिला आणि लहान मुलांशी संवाद साधत, मुलांना शिक्षण आणि देशसेवेचे महत्त्व समजावले. काही मुलांनी “आम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे” असे सांगताच, आयुक्तांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

अजनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन राजकुमार ३० अंमलदारांसह काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. पोलीस नियंत्रण कक्ष व RCP पथकही काही वेळात दाखल झाले. एकूण १० अधिकारी आणि ५० अंमलदार या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारांविषयी मिळणारी अपुरी माहिती याबाबत नाराजी व्यक्त करत, अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले. “गुन्हेगार जेलमधून बाहेर येऊन परत वस्तीमध्ये मिसळतात. किरकोळ वाद गंभीर गुन्ह्यात रूपांतरित होतो. त्यामुळे पोलिसांनी सतत नजर ठेवावी,” असा स्पष्ट संदेश दिला.

ही थेट कारवाई गुन्हेगारांसाठी इशारा ठरली असून, सामान्य नागरिकांसाठी ती सुरक्षा आणि आश्वासकतेचा नवा किरण ठरली आहे. “आधी कधीच असं दृश्य पाहिलं नव्हतं,” असे अनेक नागरिकांनी सांगितले.

0 8 9 4 7 1
Users Today : 1
TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *