चिखली:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा पीकविमा द्यावा, अन्यथा विमा कंपनीवर गुन्हे दाखल करू, असा आक्रमक पवित्रा घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव घुबे व परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी आज येथील कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित पीकविमा वितरीत करण्याचे आणि तुटपुंजी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाच तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.२०२३-२४ मध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाल्यानंतर नियमानुसार ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पंचनामे देखील झाले. एकरी केवळ १०००, ५००, २०० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विमा प्रतिनिधींकडून याबाबत विचारणा केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. या अनियमित आणि नियमबाह्य कारभाराविरोधात आज शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाचा ताबा घेतला.अखेर, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कृषी विभागाने उर्वरित शेतकऱ्यांचा पीकविमा पुढील पंधरा दिवसांत खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, ज्या शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम मिळाली आहे, त्यांच्यासाठी तालुका तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन उर्वरित रकमेचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आणि शेतकऱ्यांना सर्वेक्षणाची प्रत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. याव्यतिरिक्त, पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या दोन दिवसांत ग्रामपंचायत स्तरावर लावल्या जातील, असेही सांगण्यात आले.गोपाल ढोरे, ऋषिकेश भोपळे, पंजाबराव मुजमुले, विकास घुबे, विनोद घुबे, विशाल चिंचोले, तुळशीदास घुबे, गणेश घुबे, भगवान इंगळे, नारायण मिसाळ, कृष्णा तरमळे, गजानन तोरमल, शिवाजी तरमळे, अनिल डुकरे, देवीदास मुजमुले, प्रकाश घुबे यांच्यासह शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.
Users Today : 15