लग्नात पावसाचे विघ्न; वधू पित्यांवर अवकाळी संकट

Khozmaster
3 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

लाडक्या लेकीचे हात पिवळे करण्यासाठी सोयरसंबंध जुळवले. थाटामाटात लग्न करण्याकरिता मोठा खर्च केला. तिथीनुसार विवाहाची संपूर्ण तयारी झाली. पण, अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्यांवरच मोठे विघ्न कोसळले. उभारलेले मंडप वादळात उडाले. पावसात साहित्य भिजले. दाणादाण उडाली. वऱ्हाड्यांची दैना झाली. वधूपित्याने केलेल्या खर्चावर अवकाळीने पाणी फेरले. ठिकठिकाणच्या लग्न समारंभांमध्ये वधूपित्यांवर आर्थिक संकट ओढवले. मे महिन्यात प्रखर वैशाख वणवा पेटलेला असतानाच निसर्गाने लहरीपणा दाखवून दिला. उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना निसर्गाने अवकाळी पावसाने दिलासा दिला असलातरी हा गारवा वधू-वर पित्यांकरिता नुकसानकारक ठरला आहे. ७ मे रोजी सकाळपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. परंतु दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचे प्रमाण इतके वाढले की, रस्त्यांवर पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विवाह सोहळ्यांना बसला. अनेक ठिकाणी विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहाच्या वातावरणात जमलेल्या वऱ्हाडी मंडळींना अचानक आलेल्या पावसाने मोठा त्रास दिला. अनेक ठिकाणी लग्नासाठी उभारलेले मंडप वाऱ्याच्या वेगाने कोसळले. ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांना मिळेल त्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. यामुळे नियोजित वेळेत विवाह पार पडणार की नाही, याची चिंता सर्वांनाच सतावत होती. वऱ्हाड्यांची तारांबळ शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. तसेच, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. वीजपुरवठा खंडित झाला होता. नैसर्गिक संकटामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शेतकरी आधीच उन्हाच्या तडाख्याने त्रस्त होते त्यात आता या अवकाळी पावसाने त्यांच्या पालेभाज्यांचे नुकसान झाले. आंब्यालादेखील या पावसाचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी पाहणी सुरू करण्यात आली आहे. आपत्तीमुळे ऐन लग्नसराईत झालेल्या या गोंधळामुळे अनेक कुटुंबांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मंडप उडाला; मंदिरात बांधली लग्नगाठ तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे वादळाने उडून विवाह मंडप जमीनदोस्त झाला. पावसाने नुकसान झाले. अशा स्थितीत ७ मेच्या सायंकाळी विठ्ठल-रुख्माई मंदिरात विधिवत विवाह सोहळा पार पडला. संतोष नामदेव ठेंग यांनी आपली लाडकी लेक भारतीच्या विवाहाची जय्यत तयारी केली होती. प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता. ७ मे रोजी सायंकाळी ६.४० वाजता विवाह मुहूर्त होता. मात्र त्याआधीच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही क्षणातच वाऱ्याचा वेग इतका वाढला की मंडप कोसळला. खांब उखडून पडले आणि छत फाटून दूरवर फेकल्या गेले. पावसामुळे विवाहस्थळावर चिखल आणि पाणी साचले. अचानक आलेल्या या संकटाने वधूपित्याचे मोठे नुकसान झाले. मोठा व्यत्यय आला. गावकरी व नातेवाइकांनी संतोष ठेंग यांना धीर दिला आणि मदतीसाठी पुढे आले. अखेर परिस्थितीचा अंदाज घेऊन गावातील विठ्ठल-रुख्माई मंदिरात विवाह सोहळा पार पडला.

0 9 5 5 1 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *