वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्या हस्तक्षेपाने अन्यायग्रस्त ड्रायव्हरला मिळाला न्याय
नागपूर | प्रतिनिधी
गौरी गणेश कंपनीतील एका ड्रायव्हरवर स्थानिक कामगाराकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर, नागपूरच्या वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनने पुढाकार घेत न्याय मिळवून दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष चांदेकर, उपाध्यक्ष अंकित धूपे, सचिव अनंता पुरी आणि कार्यकारी सदस्य नीलेश डुंभरे यांनी कंपनीमध्ये भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडित ड्रायव्हरला न्याय मिळवून दिला.
या वेळी संघटनेने सर्व ड्रायव्हर बांधवांना एकत्र येण्याचे, आपसात ऐक्य राखण्याचे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. संतोष चांदेकर यांनी भावनिक शब्दात सांगितले,
“जय जवान – देश रक्षणासाठी, जय किसान – देश अन्नदात्यासाठी, आणि जय सारथी – देशाच्या गतीसाठी. हे तिन्ही देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. वाहनचालक म्हणजे देशाच्या यंत्रणेतील अविभाज्य सिपाई!”
ते पुढे म्हणाले, “ड्रायव्हर एकता हीच खरी ताकद आहे. ट्रॅफिक नियमांचे पालन करा, आणि एकमेकांना सहकार्य करा, हीच खरी देशसेवा आहे.”
फाउंडेशनच्या या तत्पर आणि कणखर भूमिकेमुळे ड्रायव्हर समाजामध्ये एक विश्वास निर्माण झाला असून, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या कृतीचे कौतुक होत आहे.
Users Today : 33