आगामी जिल्हापरिषद वर ताबा घेण्यासाठी महाविकासआघाडी ची मोर्चे बांधणी

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा ( जिल्हा  प्रतिनिधी )- राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम बुलढाणा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही पडला असून, त्यामुळे आगामी निवडणूक चांगलीच राजकीय चुरशीची होणार आहे. यापूर्वी, काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सत्ता वारंवार कायम ठेवली असून, त्यासाठी जिल्ह्याचे नेते मुकूल वासनिक यांचे सोशल इंजिनिअरिंग चांगलेच महत्वाचे ठरले होते. मागीलवेळी काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता मिळवली होती. आता शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले असून, ठाकरे यांची शिवसेना काँग्रेससोबत तर शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत आहे. तसेच, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासारखे सहकारातील वजनदार नेतृत्वदेखील महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेससोबत आहे.
त्यामुळे महाआघाडीचे दिग्गज नेते पुन्हा एकदा भाजपला सत्तेपासून ‘वंचित’ ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), प्रा. नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे सहसंपर्कप्रमुख), राहुल बोंद्रे (काँग्रेस अध्यक्ष) आणि संदीप शेळके (शिवसेना-ठाकरे जिल्हा समन्वयक) या नेत्यांनी जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यासाठी गावपातळीवरील रणनीती निश्चित केली असली तरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भूमिकादेखील या निवडणुकीत महत्वपूर्ण राहणार आहे. या निवडणुकीनंतर तुपकर हे जिल्हा परिषदेच्या सत्तेतील ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून २०१७ चा अपवाद वगळता काँग्रेसचीच सत्ता जिल्हा परिषदेत राहिलेली आहे. २०१७ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून भाजपच्या उमाताई तायडे अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्यात. दुसऱ्या टर्मला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची युती होऊन पुन्हा काँग्रेसच्या मनिषा पवार या अध्यक्ष झाल्या होत्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *