मेहकर शहर प्रतिनिधी मेहकर तालुक्यात 24 तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी व नागरिकांचे अतोनात हाल होवून भरपूर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाचा आज शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दौरा केला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी अधिवेशनात विशेष पॅकेज मागणार आहे#25 जूनला सायंकाळी सुरू झालेल्या पावसाची 24 तासाची नोंद तालुक्यासाठी सरासरी 200 मीटर मोजल्या गेली आहे. हा गत कित्येक वर्षातील विक्रमी पाऊस आहे. या संततधार पावसामुळे मेहकर तालुक्याचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र रस्ते बंद झाले होते . नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने तसेच शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा आज आमदार सिद्धार्थ खरात यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला. त्यानंतर विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणीबाबत सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की सर्व विभागाला पंचनाम्याबाबत सूचना करण्यात आल्याआहेत मेहकर तालुक्यात सरासरी 80 हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. जवळपास 60 ते 70 टक्के पेरण्या झालेल्या आहेत .यापैकी 70% पर्यंत नुकसान झाले. एवढा संततधार पाऊस सर्वत्र पडला. पाच दिवसात पंचनामे होतील असे अधिकारी वर्गाने सांगितले आहे. पंचनामे करताना काळजीपूर्वक पंचनामे करा अशा सूचना सुद्धा संबंधितांना देण्यात आल्या आहेत. पाऊस किती यावा हे आपल्या हातात नसले तरी मदत जास्तीत जास्त देणे हे आपल्या हातात आहे हा विचार करा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.झालेल्या संततधार पावसाबाबत सांगताना ते म्हणाले की सुलतानपूर येथील सीता नानी नदी, मेहकर येथील पैनगंगा नदी, डोणगाव येथील काच नदी, देऊळगाव साखरशा येथील उतावळी नदी आपल्या पात्रापेक्षा जवळपास दोन ते तीन पुरुष वर पाणी घेऊन वाहत होती. हे सर्व पाणी शेतात, जवळपासच्या गावात, घरात घुसले या पावसामुळे कणका माळेगाव, मोहना, सावत्रा येथील धरणांना सुद्धा बाधा होऊन सर्व पाणी शेतात गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .जागतिक बँकेचे जे प्रोजेक्ट सुरू आहे त्यात जी पुलाची कामे सुरू आहेत ते सर्व मटरेल संबंधित कंत्राट दाराने नदीतच टाकून दिल्याने मोठ्या प्रमाणावर पूर येऊन नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टीला संबंधित कंत्राटदार व संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. येत्या 29 तारखेला सर्व विभागाची आढावा बैठक घेऊन पुन्हा एकदा नुकसानी बाबतचा सर्व अहवाल तयार होणार आहे. तर ३० तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मेहकर व लोणार साठी नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जे सिमेंटचे रस्ते बांधले त्यात नाल्या बांधल्या नाही अशा अनेक तक्रारी आल्या व त्या नाल्या न बांधण्यात आल्यामुळे सर्व पाणी शेतात जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणेला सुद्धा याबाबत जबाबदार धरण्यात येणार आहे. नद्यांचे खोलीकरण न केल्याने सर्व पाणी पुलावर आले. आमदार सिद्धार्थ खरात यांचे सोबत आज पाहणी दौऱ्यात तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, प्रवीण देशमुख, गटविकास अधिकारी डी बी खरात, पुरवठा निरीक्षक एन बी.बोराडे,तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे ,मंडळ अधिकारी नितीन बोरकर सह अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहरप्रमुख किशोर गारोळे, युवा सेना शहर अधिकारी ऋषी जगताप ,काँग्रेसचे विधानसभा नेते अनंतराव वानखेडे ,युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे , संदीप गवई, माजी सभापती भास्कर ठाकरे ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप बापू देशमुख ,बाळू वानखेडे ,माजी नगरसेवक शैलेश बावस्कर ,विभाग प्रमुख गजानन राठोड, रवी चव्हाण, अमरसिंग राठोड, सुनील राठोड, विठ्ठल डवंगे, गफारशहा बाळू आखरे, विनोद खंडारे, संतोष मेटांगळे,उटीचे सरपंच संजय सुळकर, गोपाल आखाडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध ठिकाणी उपस्थित होते. तर पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे ,तहसीलदार निलेश मडके ,गटविकास अधिकारी डी बी खरात, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख ,काँग्रेसचे अनंतराव वानखेडे, युवा सेनेचे ऋषी जगताप आदी उपस्थित होते.
Users Today : 22