साखरखेर्डा बसस्थानकावर अपघात; चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

KHOZ MASTER
1 Min Read

साखरखेर्डा (ता. मुधोळ) – येथील बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. अशाच गजबजलेल्या ठिकाणी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लव्हाळा येथून आलेली भरधाव अल्टो कार (क्रमांक MH 20 BN 2520) नियंत्रण सुटून थेट उभ्या दुचाकींवर आदळली. यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

जय मल्हार टी सेंटर जवळ काही नागरिक चहा घेण्यासाठी उभे होते. याचवेळी अरुण जैवळ, विज वितरण कंपनीचे कर्मचारी, लव्हाळा येथून कारने साखरखेर्डाकडे येत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. भरधाव कारने आधी उभ्या दुचाकींना धडक दिली आणि नंतर थेट टी सेंटरमध्ये घुसली.

या अपघातात गवंडी काम करणारे रवी जाधव (सावंगीवीर) गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांच्यासोबत असलेले अनिल भास्कर गवई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. इतर दोघांना किरकोळ मार लागला असून त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.

घटनेनंतर काही वेळ पोलीस कर्मचारी हजर नव्हते. परिणामी जमलेल्या जमावाने वाहनावर दगडफेक केली. मात्र काही नागरिकांनी समयसूचकतेने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. बातमी लिहेपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याने गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *