चंदन तस्करी प्रकरण उघडकीस; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Khozmaster
2 Min Read

मलकापूर (जि. बुलढाणा) – मध्य प्रदेशात नेण्यासाठी प्रयत्नात असलेले अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे आठ क्विंटल चंदन शहर पोलिसांनी सोमवारी रात्री उघडकीस आणले. या कारवाईत वाहनचालकास अटक करण्यात आली असून, एकूण २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिनगारे, पोहेकॉ श्याम शिरसाट, श्याम कपले, शिपाई कैलास सोनोने, दिलीप रोकडे आणि आनंद माने हे सोमवारी सायंकाळपासून गस्तीवर होते. बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोलपंपाजवळ एमएच-१६-एई-९६१६ क्रमांकाची मालवाहू आयशर गाडी बऱ्हाणपूर (म. प्र.) कडे जाताना दिसली.

संशयावरून गाडी थांबवून पोलीस ठाण्यात नेल्यावर तपासणी दरम्यान गाडीमध्ये छुपा कप्पा आढळून आला. त्यात सहा क्विंटल २९ किलो दीड फुटांचे चंदन गाभे आणि दोन क्विंटल चंदन गाभा व चुरा, एकूण आठ क्विंटल चंदन (किंमत १५.३० लाख) साठवलेले होते. तसेच सुमारे दहा लाख रुपये किमतीची आयशर गाडी असा एकूण २५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गाडीचालक शेख जैनुद्दीन शेख अजीम (वय ४२, रा. नेकनूर, ता. बीड) याला अटक करण्यात आली आहे.

चंदनाची तस्करी असल्याची खात्री झाल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी. पडोळ, वनपाल ए.एम. सपकाळ, तसेच वनरक्षक पी.एन. नारखेडे, आर.डी. शिरसाट आणि वैभव पुंड घटनास्थळी दाखल झाले.

ही कारवाई चंदन तस्करी रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. पुढील तपास पोलीस आणि वनविभाग संयुक्तपणे करत आहेत.

0 9 5 5 2 0
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *