खामगाव – तालुका प्रतिनिधी
प्रशासकीय इमारत परिसरातील महात्मा गांधी सभागृहात कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, रोटरी क्लब (खामगाव), कृषी विज्ञान केंद्र (जळगाव जामोद) व जी.एस. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन प्रसंगी आकाश फुंडकर यांनी आजच्या पिढीला रानभाज्यांची ओळख असूनही, येणाऱ्या पिढ्यांसाठी यांचे महत्त्व जपणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी या विषयावर कार्य करण्याची सूचना दिली. महोत्सवात सहभागी शेतकरी आणि बचत गटांना प्रमाणपत्रे आणि महसूल विभागाचे विविध सन्मानपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बचत गटांनी व शेतकऱ्यांनी विविध रानभाजींचे प्रदर्शन करून त्यांच्या आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी गुणधर्मांवर प्रकाश टाकला. आत्मा प्रकल्पाचे संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी रानभाज्यांचे जीवनातील महत्त्व याबाबत माहिती दिली. तसेच, केंद्र व राज्य शासनाच्या नैसर्गिक शेती व विविध योजनांची माहिती दिली.
शेतकरी सदानंद इंगळे यांनी रानभाजींच्या आरोग्य विषयक उपयुक्ततेवर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, पुरुषोत्तम उन्हाळे व उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्या देखरेखीखाली महोत्सव यशस्वीपणे पार पडला.
Users Today : 22