परवानगीविना टाकलेले गतिरोधक घातक ठरण्याची शक्यता – एखाद्याच्या जीवितहानीला जबाबदार कोण?”

KHOZ MASTER
2 Min Read

तानाजी मापारी | ता. प्रतिनिधी, लोणार :
लिंबी बारूव ते बेसिक शाळा मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्यावर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टाकण्यात आलेले गतिरोधक हे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. या मनमानीपणावर आता स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सामाजिक नेते समाधान आखाडे पाटील यांनी या मुद्द्यावर ठाम आणि जळजळीत भूमिका मांडत प्रशासन आणि ठेकेदाराला थेट सवाल केला आहे. “या रस्त्यावर जर अपघात झाला आणि एखाद्याचा जीव गेला, तर याची हमी कोण घेणार? ठेकेदार की लोणार नगरपरिषद?” असा थेट आणि धगधगता प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, “परवानगीशिवाय गतिरोधक टाकणं म्हणजे लोकांच्या जिवाशी सरळ खेळ करणं आहे. आणि जर एखादी दुर्दैवी घटना घडलीच, तर त्याची जबाबदारी घेणारे पुढे यायला हवेत. की नेहमीप्रमाणे सगळं गुपचूप झाकलं जाणार?”

या रस्त्यावर ना कोणतीही संकेतचिन्हं, ना चेतावणी फलक, ना नागरिकांची माहिती घेण्याची प्रक्रिया – हा सगळा प्रकार प्रशासनाच्या बेपर्वा आणि बेजबाबदार कार्यशैलीचा नमुना असल्याचं चित्र आहे.

“विकासाच्या नावाखाली जर अशा घटनांना निमंत्रण दिलं जात असेल, तर तो विकास नव्हे – तो थेट जनतेच्या जिवावर उठलेला विनाश आहे,” असा रोषही त्यांनी व्यक्त केला.

या वेळी बाळासाहेब आखाडे, पिंटू ठोकरे, अंबादास आखाडे, दत्ता मापारी, माधव मापारी, भवानी मापारी, भुऱ्या दादा मापारी, अक्षय खडसे, प्रकाश गोरे, संतोष आखाडे, राहुल मापारी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा उद्रेक अनिवार्य असल्याचा इशारा आता जनतेकडून दिला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *