मेहकर (प्रतिनिधी):
“पैसा आणि प्रतिष्ठा क्षणिक असतात, पण पुण्यकर्मे चिरकाल टिकणारी असतात,” असा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश ह.भ.प. संग्राम बापू बंडारे महाराज (आळंदीकर) यांनी दिला. ते माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम महिला महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीरज रायमुलकर आणि रविराज रहाटे यांच्या हस्ते बंडारे महाराजांचा सत्कार करण्यात आला.
🕉 संत परंपरेचा सामाजिक संदेश
बंडारे महाराज पुढे म्हणाले, “संतांनी कधीच जातीपातीचा आधार घेतला नाही. वारकरी संप्रदायाने समाजाला एकतेचा, भक्तीचा आणि आत्मचिंतनाचा मार्ग दाखवला. विचार मंथन आणि नम्रता हे संत तुकाराम महाराजांनी शिकवलेले अमूल्य धडे आहेत.”
त्यांनी शाकाहार – मांसाहार या विषयावरही भाष्य केले. “शाकाहारी वाढले, तर धान्याचे भाव वाढतात – हा शेतकरीहिताचा विचार आहे. त्यामुळे समाजात योग्य विचार रुजणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
🔱 राजकीय नेतृत्वावर मतप्रदर्शन
बंडारे महाराजांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्याचे कार्य शिंदे यांनी केले असून, ते खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत.”
तसेच, “संजय रायमुलकर हे गळ्यात तुळशीमाळ आणि कपाळी टिळा लावून कीर्तन-प्रवचन परंपरा टिकवून ठेवणारे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. ते दरवर्षी अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
🌿 कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या कीर्तन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, समाधान साबळे, भूषण घोडे, नंदू बंगाळे, सुरेशराव काळे, वैभव सावजी, रंजनाताई रायमुलकर, हर्षल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि श्रद्धावान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 25