गोर बंजारा समाजाचा महामोर्चा : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर दोन तास रास्तारोको आंदोलन

Khozmaster
2 Min Read

मालेगाव पाईंट (जि. बुलढाणा) :

गोर बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच हैदराबाद गॅझेट लागू करून सेवा सवलती द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो गोर बंजारा समाजबांधवांनी ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्गावर ऐतिहासिक रास्तारोको आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व पोहरागडचे महंत कबीरदास महाराज, प्रा. संदेश चव्हाण, महंत संजय महाराज, प्रा. डॉ. अनिल राठोड, जानू महाराज यांनी केले. या वेळी आंदोलकांनी सतगुरु सेवालाल आणि याडी मरियामाता यांना भोग लावून आरदास केला आणि शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

हजारोंचा सहभाग, वाहतुकीचा ठप्प झालेला महामार्ग

वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे पाच हजार आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर ठिय्या मांडला. जवळपास दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपूर-मुंबई दिशेच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर पोलिसांनी वाहने जुन्या नागपूर-मुंबई मार्गावर वळविली.
मागण्या शासनापर्यंत तहसील प्रशासनामार्फत

तहसीलदार दीपक पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे, मंडळ अधिकारी विजय अवचार, ग्राम महसूल अधिकारी वैभव नवघरे आणि शिपाई गणेश चौके यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकृत केले.

“सहनशक्तीचा अंत पाहू नका” — संदेश चव्हाण यांचा इशारा

आंदोलनादरम्यान प्रा. संदेश चव्हाण म्हणाले,

“गोर बंजारा समाजाची सहनशक्ती संपत चालली आहे. गेल्या महिनाभरात ५५ महामोर्चे, ९ ठिकाणी आमरण उपोषणे झाली. चार युवकांनी आत्महत्या केल्या, तरी सरकार झोपले आहे. आता आमचा आवाज दाबता येणार नाही. हक्काचे एसटी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”

तसेच शासनाने एक महिन्याच्या आत आरक्षणासंबंधी केंद्राकडे शिफारस न केल्यास, समाजाच्या वतीने रेलरोको, साखळी उपोषण आणि हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे लाखोंचा मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.
७८ वर्षांची प्रलंबित मागणी

आंदोलकांचे म्हणणे आहे की, गोर बंजारा समाज हा आदिवासींच्या वैशिष्ट्यांना पूर्ण करणारा असून, हैदराबाद गॅझेटमध्येही त्यांच्या नोंदी आहेत, तरी गेल्या ७८ वर्षांपासून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

समृद्धी महामार्गावरील हे आंदोलन शांततामय, संघटित आणि ठाम भूमिकेतून पार पडले, यामध्ये समाजातील युवा, महिला आणि वयोवृद्ध सर्वांचा मोठा सहभाग होता.

0 9 5 5 2 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *