मोताळा तालुक्यातील पोफळी येथील भिकनराव शंकरराव देशमुख जनता विद्यालयात इयत्ता १० वी (सन १९९५-९६) च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन ‘एक दिवसाची शाळा’ हा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
२५ ऑक्टोबर रोजी झालेल्या या अनोख्या भेटीचा माहोल अत्यंत आनंददायी, उत्साही आणि भावनिक असा होता. जुन्या शाळेच्या आवारात पुन्हा एकत्र जमलेले सर्व मित्र-मैत्रिणी जणू बालपणात परतल्यासारखे भावूक झाले. शाळेतील वर्ग, शिक्षकांचे परिचित आवाज आणि ओळखीचा सुगंध — या साऱ्यांनी त्या दिवसांच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या.
प्रारंभी या बॅचमधील दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गणेश ठाकूर यांनी केले, तर योगेंद्र घ्यार यांनी या स्नेहसंमेलनामागील संकल्पनेची माहिती दिली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राठोड, माजी मुख्याध्यापक तायडे, पठार, आर. के. ठाकूर, के. टी. देशमुख, अरविंद व्यवहारे, किशोर व्यवहारे, भागवत बोराडे, तसेच शाळा व्यवस्थापक नाना पाटील, अध्यक्ष दादाराव व्यवहारे, कर्मचारी पांडू पाटील, महादेव काकर, बबलू पागृत आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांसह गुरुजनांनीही या भावनिक क्षणी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत, “आपल्या शाळेसाठी काहीतरी योगदान देऊ” असा संकल्प केला.
या उपक्रमामुळे बालपणीच्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आणि सर्वांच्या मनात ‘आपली शाळा – आपला अभिमान’ ही भावना जागृत झाली.
