रिसोड/मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात रिसोड-लोणार मार्गावर देऊळगाव वायसा जवळ २९ ऑक्टोबर रोजी रात्री झाला, तर दुसरी घटना मलकापूरजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.
देऊळगाव वायसा येथे लक्झरी बसचा ट्रकला जबर धडक – ट्रकचालक जागीच ठार
२९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एमएच-३९-डी-०८०३ क्रमांकाच्या लक्झरी बसने नादुरुस्त उभ्या ट्रकला (एमएच-२७-एक्स-८८८५) मागून जोरदार धडक दिली. ही घटना देऊळगाव वायसा येथील दीनदयाल उपाध्याय आश्रमशाळेसमोर घडली.
धडकेत ट्रकच्या मागे शेकोटी करून बसलेल्या ट्रकचालकाचा जागीच मृत्यू
झाला. तर लक्झरी बसचा चालक रमेश काळूराम मरमट (वय ३१, रा. सोनपवाडी, ता. सिल्लोड) आणि अन्य चार प्रवासी जखमी झाले. लक्झरी बसचा अक्षरशः चुराडा झाला असून, ट्रक सुमारे १५ फूट पुढे ओढला गेला.
धडकेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृत ट्रकचालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
या प्रकरणी चेतन प्रमोद चौधरी (वय २५, रा. वडगाव कोल्हाटी, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिस ठाण्यात भा. दं. सं. कलम १०६(१), १२८, ३२४ सह कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणार पोलिस करत आहेत.
मलकापूरजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक – महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
दुसरी घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडली. वडोदा (पान्हेरा) येथील विमलबाई भास्कर गायकवाड या आपल्या मुलगा नरेश भास्कर गायकवाड याच्यासह दुचाकीवरून (एमएच-२८-एटी-१९१६) मलकापूरकडून घराकडे जात होत्या.
दरम्यान, पाठीमागून भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली, यात विमलबाई गायकवाड यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा नरेश गायकवाड गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच अॅड. हरीश रावळ, संतोष रायपुरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, मंगलसिंह राजपूत, विजय गायकवाड, प्रशांत गायकवाड, अनिल गांधी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. जखमी नरेश गायकवाड याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस तपास सुरू आहे.
Users Today : 28