चिखली ,दि. ३१ (प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. युतीबाबत अजूनही अनिश्चितता असताना, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या स्फोटक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“युती करायची असेल तर ती संपूर्ण जिल्ह्यात सन्मानजनक पद्धतीने करा. काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी नाही, असे आम्ही होऊ देणार नाही. चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यात बुलढाण्याची जागा मी सोडतो,” असे ठाम विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले.
चिखलीत शिंदे शिवसेनेची स्वबळावर तयारी
ही भूमिका त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत मांडली. या बैठकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या घोषणेनंतर चिखली तालुक्यातील शिंदे शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आ. गायकवाड म्हणाले, “युतीचा अंतिम निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार, जिल्हा प्रमुख आणि जिल्हा कमिटी घेणार आहेत. मात्र आमचा सन्मान राखला गेला पाहिजे.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे चिखली तालुक्याचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
बैठकीत मोठी उपस्थिती, अनेकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश
या बैठकीस जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख, अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत माजी नगरसेवक हेमंत खेडेकर, सचिन चोरघडे, समाधान बांडे, पांडा जेठे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे, व्यापारी असोसिएशनचे राकेश चोपडा यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख विलास घोलप यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन चिंचोले, राहुल शेलकर, विक्रांत नकवाल, राका मेहेत्रे, अमर सुसर, अमर काळे, सतीश हिवाळे, विनोद वनारे, साहिल काझी, योगेश गवई, बलराज शेटे, दीपक मगर, विकी निकाळजे, नारायण देशमाने, संदीप अंभोरे, मदन राऊत यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
