अटाळी (ता. खामगाव), दि. ३० (प्रतिनिधी)
तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अटाळी येथील सद्गुरु संत भोजने महाराज संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प.पू. संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारंभ झालेल्या या सप्ताहाचा भव्य समारोप ३० ऑक्टोबर रोजी भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.
या दरम्यान दररोज रात्री ८ ते १० वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन कार्यक्रम पार पडले. अखेरच्या दिवशी हजारो भाविकांनी संतांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र अटाळी येथे गर्दी केली होती.
या प्रसंगी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी संस्थानला भेट देऊन संत भोजने महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर भक्तिभावाने अभिवादन करून त्यांनी संतांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक श्रीकृष्ण टिकार, माजी जि.प. सदस्य श्रीकृष्ण धोटे, सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, तसेच डॉ. दिलीप काटोले, हरीष काटोले, संजय भिसे, सोपान काटोले, भगवान सुलताने, संजय काटोले, ब्रिजलाल पवार, मुरलीधर डिक्कर, परसराम पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संत भोजने महाराज संस्थानतर्फे निवृत्ती महाले यांनी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा शेला, टोपी आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रामायणाचार्य विदर्भरत्न ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याचे कीर्तन पार पडले. त्यानंतर नगर प्रदक्षिणेनंतर भक्तीभावपूर्ण वातावरणात महोत्सवाचा समारोप झाला.
समारोपानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पंचक्रोशीतील विविध गावांमधून आलेल्या सेवेकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांची सेवा बजावून प्रसाद वितरण केले.
Users Today : 33