सिंदखेडराजा, दि. ३१ (प्रतिनिधी)
सिंदखेडराजा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या.
ही बैठक भाजप जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांच्या फार्महाऊसवर आयोजित करण्यात आली होती. बैठकीत नगरपालिकेतील राजकीय समीकरणांचा आढावा घेत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वतीने इच्छुक उमेदवारांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे, माजी नगरसेवक रामदास केळकर, तसेच भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अशोक मेहेत्रे यांनी मुलाखती दिल्या.
तर नगरसेवक पदासाठी तब्बल ४० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी सादर करून मुलाखत दिली असून, आणखी काही इच्छुकांच्या नावांवर पक्षस्तरावर चाचणी सुरू असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
बैठकीदरम्यान नगरपालिकेत पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने विविध धोरणांवर चर्चा झाली. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 33