संग्रामपूर, दि. ३१ (प्रतिनिधी)
नागपूर येथे सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. किसान काँग्रेस (राष्ट्रवादी), शिवसेना (उबाठा) तसेच शेतकरी संघटना यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला असून पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी सतत कर्जबाजारी राहात आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकावरील रोगराई यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
सन २०१४ पासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कोणतीही वाढ न होता कर्जाचे ओझे वाढतच गेले, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांची खरी आर्थिक सुधारणा कर्जमुक्तीशिवाय शक्य नाही, असा ठाम सूर या निवेदनातून व्यक्त करण्यात आला.
शेतकरी वर्गाला न्याय मिळावा व सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाला सर्व जाती-पाती, धर्मातील शेतकऱ्यांचा एकमताने पाठिंबा मिळाल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.
या वेळी किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश मानखैर पाटील, श्रीकृष्ण दातार, अभयसिंह मारोडे, दीपक गव्हांदे, प्रवीण मोरखडे, गोपाल इंगळे, राहुल उमाळे, विनय मानखैर, हेमंत मानखैर, नामदेव मानखैर, सुरेश आवारे, संतोष लाहुडकार, नारायण बोरवार, प्रकाश बोरवार, वामनराव बोरसे, समाधान अंधारे, विठ्ठल दुकाने, तेजराव गायकी, आकाश बोरसे, मनोज आवारे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
