भादोला येथे सर्वधर्मीय सलोख्याने दिवाळी फराळाचे आयोजन

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी)
बुलढाणा तालुक्यातील भादोला गावात सर्वधर्मीय एकतेचा अनोखा संदेश देत यावर्षीही परंपरेप्रमाणे हिंदू बांधवांकडून मुस्लीम समाजातील बांधवांना दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि परस्पर स्नेहभावाचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवण्यात आले.

भादोला गावाला विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींचा सहवास लाभलेला असून, वामनदादा कर्डक, शाहीर जनार्दन गवई, गोपीनाथ मिसाळ यांचा समृद्ध वारसा या गावाला लाभला आहे. विशेष म्हणजे शाहीर प्रभाकर गवई यांचीही हीच कर्मभूमी आहे. त्यामुळे गावात धार्मिक सौहार्द आणि परस्पर आदराची भावना कायम जोपासली जाते.

येथील सर्व समाजातील लोक जयंत्या, उत्सव व धार्मिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करतात. मुस्लीम बांधवांच्या वतीने ईद मिलन, बौद्ध धर्मीयांच्या वतीने बौद्ध पौर्णिमा आणि खीरदान, तर हिंदू बांधवांच्या वतीने दिवाळी फराळ यासारखे सामाजिक कार्यक्रम दरवर्षी होत असतात.

याच परंपरेचा पुढाकार घेत यावर्षी अनिल इंगळे, सूर्यकांत गवई, वसंतराव निकम, हिरालाल जैन, विनोद सिरसाट, वाल्मीक सिरसाट आणि मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पीएसआय सुरेश मोरे, एएसआय नारायण तायडे, लक्ष्मण सोळंके यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *