आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्याला यश : घानमोड, मानमोड व पांढरदेव शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी)
घानमोड, मानमोड आणि पांढरदेव या गावांतील शेतकऱ्यांच्या भूसंपादन प्रकरणात न्याय्य मोबदला मिळावा यासाठी आमदार श्वेता महाले यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर शासनाने गुणक १.५ नुसार वाढीव मोबदला देण्यास मंजुरी दिली असून, हा मोबदला सानुग्रह अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या तीन गावांतील ग्रामस्थांनी पूर्वी शासनाकडे मोबदला अन्यायकारक असल्याची तक्रार केली होती. कारण ग्रामीण भाग असूनही शेतकऱ्यांना केवळ गुणक १ नुसारच मोबदला मिळत होता. शासनाच्या नियमानुसार हा दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

शेतकऱ्यांना योग्य हक्क मिळावा म्हणून आमदार श्वेता महाले पाटील यांनी १० जुलै २०२५ रोजी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला आणि महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ठोस मागणी केली होती.

यानंतर, ३० जुलै रोजी मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार महाले यांच्या विनंतीवरून हा विषय चर्चिला गेला. बैठकीदरम्यान महसूलमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता ग्रामस्थांना वाढीव मोबदल्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आमदार श्वेता महाले यांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *