बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी
अवकाळी पावसाची नुकसानभरपाई मंजूर होऊनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात २९ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती तहसीलदार अजित जंगम यांनी दिली.
अनेक शेतकऱ्यांची आधार कार्डे व फार्मर आयडी (शेतकरी आयडी) प्रणालीमध्ये अद्यावत नसल्याने त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम हस्तांतरित होण्यात अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा म्हणून तहसीलदार अजित कुमार जंगम यांच्या संकल्पनेतून एकदिवसीय विशेष शिबिर घेण्यात आले.
शिबिरात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी हजेरी लावून आवश्यक कागदपत्रे सादर केली. यानंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ती माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
तांत्रिक कारणांमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या उपक्रमामुळे लवकरच आपल्या हक्काची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असे तहसीलदार अजितराव जंगम यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “उर्वरित प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.”
या शिबिरामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा व तत्परतेचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला असून, शेतकरी वर्गातून तहसील प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
Users Today : 33