मेहकर (प्रतिनिधी)
मेहकर निवडणूक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी कारण आहे — मतदार ओळखपत्रे मतदारांपर्यंत वेळेवर न पोहोचणे आणि मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी तपासणीशिवाय करण्यात येणे. या दोन्ही घटनांमुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणूक विभागाकडून भोपाळ येथील कंपनीमार्फत मतदार ओळखपत्रे तयार करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली जातात. जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित तहसील कार्यालयात ती जमा होतात आणि तेथून पोस्ट विभागामार्फत मतदारांना वितरित केली जातात. मात्र, मेहकर तहसील कार्यालयाकडे २६ सप्टेंबर रोजी आलेली हजारो ओळखपत्रे तब्बल २० ते २५ दिवस विलंबाने म्हणजेच अलीकडेच पोस्टात पाठवण्यात आली.
तोपर्यंत दिवाळीच्या सुट्या संपल्याने अनेक मतदार बाहेरगावी निघून गेले, त्यामुळे त्यांना मतदार ओळखपत्र मिळण्यास विलंब होणार आहे. काही ओळखपत्रे परत येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत काही नवीन मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात.
मेहकर निवडणूक विभागाने मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी करण्यापूर्वी तिची तपासणी न करता ती जाहीर केल्याने देखील प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे दर्शन झाले. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत मतदार हा राजा असतो, मात्र या राजालाच त्याचे ओळखपत्र वेळेवर मिळाले नाही तर त्याचा लोकशाहीतील सहभाग धोक्यात येतो, अशी खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या संदर्भात मेहकरचे निवडणूक नायब तहसीलदार सुरेंद्र कावळे यांनी सांगितले की,
“निवडणूक विभागात कर्मचारीसंख्या अपुरी असल्याने मतदार ओळखपत्रांची नोंद घेऊन पोस्टात पाठवण्याचे काम उशिरा झाले. मात्र, मतदार ओळखपत्रे तत्काळ मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
प्रशासनाच्या या विलंबामुळे मतदारांमध्ये नाराजी असून, अनेकांनी विभागाने वेळेत कामकाज पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
Users Today : 33