लोणार (तालुका प्रतिनिधी)
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली आज जनता दरबार पार पडला. नागरिकांच्या विविध तक्रारी आणि समस्या थेट आमदारांसमोर मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने दरबार गजबजला होता.
या जनसंपर्क उपक्रमाद्वारे “जनता आणि प्रशासन यांच्यात सेतू बनून कार्य करण्याचा निर्धार” व्यक्त करत आ. खरात यांनी नागरिकांना दिलासा दिला. दरबारात मांडलेल्या प्रत्येक विषयावर १५ नोव्हेंबर रोजी विशेष आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दरबारात नागरिकांनी रस्त्यांची दुर्दशा, घरकुल योजना, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वीजपुरवठा, तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील विलंब या विषयांवर खुलेपणाने मते मांडली. प्रशासनातील निष्क्रियतेबद्दल अनेकांनी थेट आवाज उठविला.
उपविभागीय अधिकारी (महसूल), तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी दरबारात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आ. सिद्धार्थ खरात म्हणाले,
“आजचा जनता दरबार फक्त ऐकण्यासाठी नाही, तर उत्तरदायित्वाची नवी दिशा ठरविण्यासाठी आहे. प्रत्येक प्रश्न शासनाच्या तिजोरीतून उत्तर मागतो, आणि आम्ही ते उत्तर मिळविण्यास कटिबद्ध आहोत.”
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे, तालुका समन्वयक तेजराव घायाळ, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदानंद पाटील, महिला आघाडी प्रमुख तारामती जायभाये, युवा तालुकाध्यक्ष जीवन घायाळ, तसेच विजय मोरे, गजानन मोरे, गजानन जाधव, श्रीकांत नागरे, प्रविण सरदार, बंडू जोगदंड, स्वप्निल हाडे, संजीवनी वाघ, भगवानराव चेके, समाधान साळवे, सुदन अंभोरे, परमेश्वर दहातोंडे, राजू दहातोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरबारात नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रश्न नोंदवून त्यावर प्रशासकीय यंत्रणेकडून त्वरित कार्यवाही करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
Users Today : 33