बुलढाणा (प्रतिनिधी)
भारताचे लोहपुरुष आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ आणि ‘वॉक फॉर युनिटी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनांतर्गत एकाच वेळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयात झालेल्या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन करण्यात आली. या प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी देशाची अखंडता, सुरक्षा आणि एकतेच्या भावनेला बळकटी देणारे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान, एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थी, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, व्यापारी संघटनांचे सदस्य, पत्रकार, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमादरम्यान पोलीस बॅण्डच्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
सुरक्षित मार्गदर्शनाखाली आणि आरोग्यसुरक्षेच्या सर्व खबरदारीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पुरुष गटातील विजेते अजय नरोटे, सुरज गवई, रणजीत राठोड, तसेच महिला गटातील विजेत्या प्रगती राऊत, मृणाल पडोळसे आणि कृष्णाली देशपांडे यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
५० वर्षांवरील गटात पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, अजाबराव आखरे आणि सुरेश शिंबरे यांनी विजेतेपद मिळवले.
याशिवाय सम्यक जैन, सिद्धी सोनोने आणि अनिता कापरे यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण पावरा, एलसीबी प्रमुख सुनिल अंबुलकर, जीविशा पोलीस निरीक्षक अशोक काकिवपुरे, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक ढोमणे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश रत्नपारखी यांनी केले.
Users Today : 33