युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका घ्यावी — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर (प्रतिनिधी)

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे आयोजित ‘सरदार १५० युनिटी मार्च’ अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा उत्साहात पार पडली.
या पदयात्रेचा शुभारंभ केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आ. चैनसुखी संचेती यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

या पदयात्रेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, युवक संघटना, स्वयंसेवक, एनएसएस व एनसीसी सदस्य, वारकरी मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेचा समारोप मातृ मंडळ, चाळीस बिगा येथे झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य तसेच देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर आणि जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या,

“युवकांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे. सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भारताच्या एकतेचा आणि स्वावलंबी भविष्यासाठीच्या संकल्पाचा संदेश आत्मसात करावा.”

त्यांनी पुढे सांगितले की, या पदयात्रेचे उद्दिष्ट तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक जबाबदारी आणि एकतेचा संदेश पोहोचविणे हे आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत २५ नोव्हेंबरपर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत गुजरातमधील करमसद ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, केवडिया दरम्यान राष्ट्रीय पदयात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पदयात्रेत युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सरदार पटेल यांच्या कार्याचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *