लोणार सरोवरात प्रथमच आफ्रिकन ‘वॉल्हबर्ग’ गरुडाचा विसावा

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार (प्रतिनिधी)

जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि वन्यजीव अभयारण्यात मंगळवारी प्रथमच ‘आफ्रिकन वॉल्हबर्ग’ (Wahlberg’s Eagle) या दुर्मिळ गरुड प्रजातीचा विसावा झाल्याची नोंद झाली आहे. हा मध्यम आकाराचा शिकारी पक्षी असून प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, नामिबिया, बोत्सवाना, झाम्बिया आणि झिम्बाब्वे या आफ्रिकन देशांमध्ये आढळतो. भारतात तो अत्यंत दुर्मिळ पाहुणा म्हणूनच ओळखला जातो.

या निरीक्षणामुळे लोणार सरोवर अभयारण्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आणखी वृद्धिंगत झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, वॉल्हबर्ग गरुड प्रामुख्याने सवाना आणि उघड्या जंगल प्रदेशात वास्तव्य करणारा शिकारी पक्षी असून, तो लहान सस्तन प्राणी, सरडे, छोटे पक्षी आणि कधीकधी साप यांची शिकार करतो.

भारतामध्ये या प्रजातीचा दाखला फारच क्वचित मिळतो. हवामानातील बदल, स्थलांतर मार्गातील दिशाभूल, किंवा अन्नशोधातील प्रयत्नामुळे हा गरुड भारतात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांचा विश्वास आहे की अशा दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे राज्याच्या पर्यावरणीय समतोलाचा आणि जैवविविधतेचा अभ्यास अधिक सखोल होईल.

या दुर्मिळ गरुडाचे छायाचित्र पक्षिनिरीक्षक सचिन कापुरे यांनी टिपले असून, त्यानंतर वनविभागाकडून संबंधित ठिकाणी निरीक्षण सुरू करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *