दर्यापूर : नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ — ४११ आक्षेप दाखल, घराघरांत चौकशी सुरू

KHOZ MASTER
2 Min Read

दर्यापूर प्रतिनिधी

दर्यापूर नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे उघड झाले असून, एकूण ४११ आक्षेप नागरिकांकडून नगर परिषद प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यवेक्षकांची नेमणूक करून घराघरांत प्रत्यक्ष चौकशीची मोहीम सुरू केली आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या आरक्षणासह प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आता मतदार याद्यांचा टप्पा सुरू आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात स्थानांतरित झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप नोंदविले आहेत. त्यानुसार प्रशासनाने १२ प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणीसाठी पथके पाठविली आहेत. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी आणि एक बीएलओ (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी घराघरांत जाऊन पंचनामे करून माहिती प्रशासनाकडे सादर केली आहे.

अनेक नागरिकांनी आपले नाव, पत्ता आणि मतदार क्रमांक तपासण्याची विनंती केली असून, प्रशासनानेही सत्यापन प्रक्रिया गतीमान केली आहे. चुकीची नोंद, नावाची पुनरावृत्ती आणि पत्त्यांतील विसंगती दूर करण्याचे काम सुरू आहे.

प्रशासनाचा दावा आहे की अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व त्रुटी दुरुस्त केल्या जातील. तथापि, मतदार यादीतील ही विसंगती आगामी नगरपरिषद निवडणुकीतील वादग्रस्त मुद्दा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *