बाळापूर (प्रतिनिधी)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून बाळापूर शहरात ‘रन फॉर युनिटी’ (एकता दौड) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मिशन उडाण अंतर्गत शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी जयस्तंभ चौक, बस स्टँडसमोर पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन होते. त्यांनी हिरवी झेंडी दाखवून एकता दौडीला प्रारंभ केला. दौड जयस्तंभ चौकातून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत पुन्हा बस स्टँड परिसरात संपन्न झाली.
कार्यक्रमात ठाणेदार प्रकाश झोडगे, बाळापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य, पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड युनिटचे डॉ. संतोष धबाले तसेच शाळा-विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देणारी ही दौड जनतेत एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी आणि लोहपुरुष पटेलांच्या कार्याची प्रेरणा स्मरणात ठेवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. शहरात संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमले होते.
Users Today : 18